पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची प्रतिदिन हत्या केली जात आहे. पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्यांक सुरक्षित नाही. मुसलमानांचे लहान पंथही सुरक्षित नाहीत, अशी स्वीकृती पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने ईशनिंदा (कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान) आरोपांशी संबंधित घटनांत जमावाकडून संबंधितांच्या होणार्या हत्यांच्या अलीकडील घटनांचा निषेध करणारा ठराव संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आसिफ बोलत होते. ‘बर्याच पीडितांचा ईशनिंदा आरोपांशी संबंध नव्हता; परंतु वैयक्तिक सूडबुद्धीमुळे त्यांना लक्ष्य केले गेले’, असाही आरोप त्यांनी केला.
१. ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, आपण आपल्या अल्पसंख्यांक बांधवांचे संरक्षण केले पाहिजे. त्यांना या देशात रहाण्याचा तितकाच अधिकार आहे, जितका बहुसंख्यकांना आहे. पाकिस्तान सर्व पाकिस्तानी लोकांचा आहे, मग ते मुसलमान, ख्रिस्ती, शीख किंवा इतर कोणत्याही धर्माचे असोत. आपली राज्यघटना अल्पसंख्यांकांना पूर्ण संरक्षणाची हमी देते. (मग त्यानुसार आतापर्यंत राज्यकर्ते का वागले नाहीत ?, हे आसिफ सांगतील का ? – संपादक)
२. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने जोरदार विरोध केल्यामुळे पाक सरकार ईशनिंदेविषयीचा ठराव मांडू शकले नाही, असे ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.
पाकमधील ईशननिंद कायदा, हा जगातील सर्वांत कठोर कायदा !
पाकिस्तानमधील ईशनिंदा कायदा जगातील सर्वांत कठोर आहे आणि देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. पाकिस्तान दंड संहितेत अंतर्भूत असलेला हा कायदा इस्लाम, प्रेषित महंमद आणि कुराण यांचा अपमान करणार्यांना मृत्यूदंडासह कठोर शिक्षा देतो.
पाकच्या ‘डॉन’ वृत्तपत्रात म्हटले आहे की, ख्रिस्ती, हिंदु आणि शीख यांच्यासह धार्मिक अल्पसंख्यांकांना ईशनिंदा कायद्यांतर्गत असमानतेने आरोपी अन् दोषी ठरवले जाते. मुसलमानांमधील अल्पसंख्यांक पंथ असलेल्या अहमदिया मुसलमानांनाही छळ सहन करावा लागतो; कारण त्यांना पाकिस्तानच्या घटनेत मुसलमान मानले जात नाही. २५ मे या दिवशी सरगोधा शहरात एका ख्रिस्ती व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्याचे घर जाळले गेले. हा छळ केवळ ईशनिंदेच्या आरोपापुरता मर्यादित नाही. हिंदु आणि शीख अल्पसंख्यांकांना, विशेषतः सिंध प्रदेशातील अल्पसंख्यांकांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो अन् त्यांच्या मुलींचे अनेकदा अपहरण केले जाते, तसेच त्यांना धर्मांतरित करून त्यांचे मुसलमान पुरुषांशी लग्न लावून दिले जाते.
संपादकीय भूमिका
|