दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : आज रिक्शाचालकांचे आंदोलन !; मृतदेह ३ घंटे रुग्णालयात पडून !…

आज रिक्शाचालकांचे आंदोलन !

मुंबई – वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारला दिल्या आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील रिक्शाचालकांनी २४ जूनला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्र वैधता संपलेल्या दिनांकापासून ५० रुपये प्रतिदिवस याप्रमाणे विलंब शुल्क आकारले जात आहे.


मृतदेह ३ घंटे रुग्णालयात पडून !

नाशिक – मृत महिलेची नोंद नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यात करायची ? हे ठरवण्यात वेळ गेल्याने मृतदेह ३ घंटे जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. यामुळे मृत महिलेच्या कुटुंबियांना पुष्कळ मन:स्ताप सहन करावा लागला.

संपादकीय भूमिका : असंवेदनशील पोलीस !


पैसे उकळणारे २ पोलीस निलंबित !

नागपूर – रिक्शात घरगुती सिलिंडर वापरणार्‍या रिक्शाचालकाला पकडून कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली. या प्रकरणी मंगेश लांजेवार आणि अरशद रईस शेख या २ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका : पोलीस कायद्याचे रक्षक कि भक्षक ?


पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद !

मुंबई – पंतनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या ३१ वर्षीय विवाहित महिला शिपायाला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर पोलीस उपनिरीक्षकाने दोनदा अत्याचार केला. तिच्याकडून १९ लाख रुपये उकळले, तसेच पतीला सोडून न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


लग्न जुळत नसल्याने तरुणीची आत्महत्या !

वसई – बोलण्यातील अडचणीमुळे लग्न जुळत नसल्याने ३० वर्षीय श्वेनी धंधुकिया हिने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे. बघायला येणारी सर्वच मुले तिला नकार देत होती. शेवटी तिने स्वयंपाकघरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

संपादकीय भूमिका : तरुण पिढीने इतका आततायीपणा करणे धोकादायक !


स्पर्धा परीक्षेसाठी गेलेल्या तरुणाची आत्महत्या !

जळगाव – स्पर्धा परीक्षेसाठी गेलेल्या कुलदीप उपाख्य भटू पाटील (वय २७ वर्षे) याने गळफास लावून आत्महत्या केली. यामागील कारण समजू शकलेले नाही. परीक्षेनंतर त्याचा संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी तक्रार दिली. बांधकाम चालू असलेल्या इमारतीत गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.