‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !
१. कलियुगात पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्यापेक्षा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त व्हा !
‘केवळ पाच सहस्र वर्षांपूर्वी कलियुगाचा आरंभ झाला. कलियुगाच्या आरंभीच अशी स्थिती आहे की, ती आपण सहन करू शकत नाही. कलियुगाची आणखी साडेचार लक्ष वर्षें बाकी आहेत. अशा कलियुगात पृथ्वीवर पुन्हा पुढचा जन्म घेण्यापेक्षा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊन पुढे जायला हवे. ‘कालमाहात्म्य कसे असते’, ते समजून घ्या. रात्रीचे दोन वाजले आहेत आणि बाहेर पुष्कळ अंधार आहे. त्यामुळे जर कुणाला ‘सकाळ कधी होणार ?’, असा ताण आला, तर अवघ्या ४ घंट्यांनंतर सहा वाजणार आणि सूर्याेदय होणारच आहे ! असे असतांना चिंता कशाला करायची ?
२. हिंदु राष्ट्र-स्थापन होण्यासाठी प्रयत्न करणे, हीच साधना !
कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे; परंतु आपल्याला त्यासाठी प्रयत्न का करायचे आहेत ? कारण ती आपली साधना आहे. त्रेतायुगात सहस्रो वर्षे तप केले जात होते. ऋषिमुनींचा तो साधनामार्ग होता. त्या काळी तशी साधना करण्यासाठी पूरक वातावरण होते. असे असूनही त्यांना सहस्रो वर्षे तप करावे लागत होते. कलियुगात आता आपत्काळाला आरंभ झाला आहे. आपत्काळात साधना करणे कठीण असते. अशा स्थितीत जे साधक साधना करतात, त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होते. या काळात साधना करण्याचे हे महत्त्व आहे. (क्रमश:)