भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

प्रकरण ४

प्रकरण ३ वाचण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/806135.html

१. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व !

भारताचार्य सु.ग. शेवडे

‘अक्षरांचा समुदाय म्हणजे शब्द नव्हे ! ‘प’-‘झ’-‘ट’-‘न’ अशी काहीतरी अक्षरे एकत्र ठेवली, तर शब्द होत नाही. शब्द सिद्ध होण्यासाठी त्या अक्षरांच्या समुदायाला एक अर्थ असावा लागतो. ‘प’, ‘र्य’, ‘ट’, ‘न’ ही ४ अक्षरे एकत्र असतांना ‘पर्यटन म्हणजे प्रवास’ हा अर्थ प्राप्त होतो; म्हणूनच तो एक शब्द आहे. अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते. हिंदुस्थानात हिंदु हा धर्म, संस्कृत हीच मुख्य भाषा, तसेच भारतीय संस्कृती, सर्वांचा समान इतिहास आणि सर्वांचे समान पूज्यस्थान असणारे हिंदु हेच राष्ट्र आहे. हिंदुत्व हेच येथील राष्ट्रीयत्व आहे. ‘भारतीय’ हा आमचा पत्ता आहे. हिंदु ही आमची ओळख आहे. असा एकजिनसी आणि स्वाभिमानी समाज अत्यंत शक्तीमान असतो; मात्र त्याला राष्ट्रीयत्वाची जाण हवी. तो लहान का असेना ! इस्रायलमधील ज्यू लोक हे संख्येत काही लाखच आहेत; पण ते भक्कम राष्ट्र आहे.

२. सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र !

ब्लंटस्ली हा विख्यात राजनीतीज्ञ ‘राष्ट्र’ शब्दाविषयी म्हणतो, ‘‘It is a union of masses of men of different occupations and social state in a hereditary society of common spirit. Feeling of race bound together especially by language and customs in a common civilization which gives them a sense of unity and distinction from all foreigners quite apart from the bond of the state.’’

याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. विविध व्यवसाय आणि पात्रता असूनही समान अभिमान असणारा, अनुवंशिक परंपरा लाभलेला सुसंघटित जनसमुदाय हे राष्ट्र होय. समान संस्कृतीमधील, विशेषतः भाषा आणि रितीरिवाज यांमुळे एकवंशीयत्वाची जाणीव ऐक्यभावाची प्रेरणा अन् इतरांपासूनची भिन्नता प्राप्त करून देते. या राष्ट्रीयतेचा राज्यशासनाशी काही संबंध नाही.

३. राष्ट्रीयत्वाची भावना आणि तिच्याशी निगडीत घटक !

‘Introduction to political science’ या पुस्तकात गेटेल म्हणतो, ‘Nationality is to denote a population having common bonds of race, language, religion, tradition and history. The influences create the consciousness of unity that binds individuals into a nationality.’

जाती, भाषा, धर्म, परंपरा आणि इतिहास यांच्या एकत्वामुळे जनसमुदायाला जी ओळख प्राप्त झालेली असते, ती त्यांची राष्ट्रीयता (Nationality) असते. हे घटक त्या जनसमुदायातील प्रत्येक व्यक्तीला एकाच राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणतात.

अशा प्रकारे भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे हिंदुत्व हेच हिंदूंचे राष्ट्रीयत्व आहे.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

(पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/807162.html)