भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

प्रकरण ३

‘धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।’ (महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११)

अर्थ : धर्म प्रजेची धारणा करतो. प्रजेला धरून ठेवतो. सर्व प्रजा धर्मबंधनांनी बांधलेली असे.

‘अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९११) म्हणजे ‘अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे, असे ईश्वराचे मनोगत आहे’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. २० जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘४ वर्ण आणि त्यांची कर्तव्ये, जातींच्या उत्पत्तीचा उद्देश अन् ब्राह्मणांमधील जाती’, यांविषयी वाचले. आज त्याचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक ९)

लेखांक ८ वाचण्यासाठी येथे क्लिक का : https://sanatanprabhat.org/marathi/805759.html

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

५. जातीच्या संदर्भातील विविधांगी विचार !

स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा हरितोषणात् ।
साधनं प्रभवेत्पुंसां वैराग्यादि चतुष्टयम् ।।

अर्थ : स्वतःच्या वर्णाश्रमधर्मानुसार आचरणाने, तपाने, परमेश्वराला संतुष्ट करण्याने मनुष्याला वैराग्य आदी ४ साधने (वैराग्य, यम, नियम आणि स्वाध्याय) प्राप्त होतात.

म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें ।
क्रिया कठोर तर्‍ही तेणें । तेचि करावी ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९३१

अर्थ : म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल आणि ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल, ते विहित कर्माचरणच करावे.

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे विहित कर्तव्यकर्म, संसारातील जिवाचे अडकून रहाणे सोडवते, ते जरी कठीण वाटले, तरी तेच करावे.

उ. जगद्गुरु आद्यशंकराचार्य म्हणतात, ‘स्वतःच्या वर्णाश्रमधर्माच्या आचरणाने, तपाने, परमेश्वराला संतुष्ट करण्याने मनुष्याला वैराग्यादी चतुष्ट्य प्राप्त होते; म्हणून सदाचार म्हणजे शास्त्राचार आणि या शास्त्राचाराचा संबंध परमार्थाशी, आत्मकल्याणासाठी आहे.

६. अनुशासनाचे महत्त्व

परमेश्वर, पाप-पुण्य, पुनर्जन्म, कर्मविपाक यासंबंधीच्या विचारांच्या वर्चस्वामुळे मनुष्य स्वतःच स्वतःला वागणुकीच्या नियमांनी बांधून घेतो, हेच अनुशासन होय. प्रत्येक माणसाने सदाचाराने, परस्पर सहकार्याने, विरक्त भावनेने, निःस्वार्थपणाने वागावे, यासाठी या जगात धार्मिक अनुशासनासारखी कोणतीही अन्य योजना नाही. मी चांगले का वागावे ? याला ईहवादी तत्त्वज्ञानात उत्तर नाही.

न वै राज्यं न राजाऽसीत् न दण्डो न च दाण्डिकः ।
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम् ।। – महाभारत, पर्व १२, अध्याय ५८, श्लोक १४

अर्थ : त्या वेळी राज्य नव्हते, राजा नव्हता, अपराधी नव्हता, दंड करणारा कुणी नव्हता. सर्व प्रजा कर्तव्यबुद्धी आणि सामंजस्याने परस्परांशी वागून एकमेकांचे रक्षण करत असे.

पूर्वी राज्य नव्हते, राजा नव्हता, कायदा नव्हता, पोलीस नव्हते. सर्व समाज परस्परांचे रक्षण धर्मानेच करत होता. आजचा समाज कर्तव्याधिष्ठित न रहाता द्वेषाधिष्ठित आणि स्वार्थमूलक विचार करणारा झाला आहे. अर्थप्रधान विचारसरणी ही विनाशाकडेच नेल्याविना रहात नाही.

७. सामाजिक समता

‘भारतीय संस्कृतीत विषमता आहे’, असा एक आरोप आहे. विश्वातच अटळ अशी विषमता आहे. Wants are not equal and degree of satisfaction is not equal. गरजा समान नसतात आणि समाधानाचे प्रमाणही समान नसते, हा मानवी स्वभाव आहे. आर्थिक समता तर असंभव आहे. समान वेतन घेणार्‍या कुटुंबांची आर्थिक स्थिती ५ वर्षांनी सारखी असणार नाही; म्हणून या विश्वातील व्यवस्था विषमच असणार. एखाद्या रुग्णालयामध्ये रोगी वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त आहेत, तर त्यांना वेगवेगळी औषधेच दिली पाहिजेत. वेगवेगळे वय, वेगवेगळे अधिकार, वेगवेगळी पात्रता, वेगवेगळी प्रतिष्ठा, वेगवेगळे संबंध यांप्रमाणेच आपणही आपल्याशी संबंधित व्यक्तींशी वागत नाही का ? किंबहुना विषमता हाच विश्वाचा पाया आहे आणि विषमता हेच त्याचे उत्तर आहे. यावर उतारा एकच आहे, ‘जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ११८) म्हणजे ‘जो जो प्राणी दिसेल, ताे तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, असे समजावे.’ सर्वांभूती भगवत्भाव, अशी समदृष्टी असावी.’

(क्रमशः)

– भारताचार्य धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

प्रकरण ४. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/806522.html