भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

२२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना आणि तिच्याशी निगडित घटक’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. 

(लेखांक ११)

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/806522.html

प्रकरण ४

४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ?

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

या भूतलावर हिंदुस्थानाविना आम्हाला दुसरा देश नाही. आमची कर्मभूमी, पुण्यभूमी, जन्मभूमी, मातृभूमी आणि प्राणप्रिय भूमी भारत हीच आहे.

आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः ।।

अर्थ : सिंधू नदीपासून सागरपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण  भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदु’ शब्दाची केलेली ही व्याख्या अत्यंत सार्थ आहे. सिंधुनदीपासून दक्षिणेस महासागरपर्यंतची भूमी ज्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, तो हिंदु ! ही ‘हिंदु’ या राष्ट्रीयत्वाची व्याख्या आहे.

५. भारतीय प्राचीनतम संस्कृतीचे वैशिष्ट्य !

ज्या वेळी मानव संपूर्ण  रानटी स्थितीत होते, तेव्हा अत्यंत उच्चतम तत्त्वज्ञान आणि शास्त्रे यांचे वेदघोष या भूमीत होत होते. जेव्हा जगातील लोकांना वस्त्रप्रावरणांचे ज्ञान नव्हते, तेव्हा येथे अत्यंत तलम रेशमी वस्त्रे निर्माण होत होती. जेव्हा अन्नधान्य शिजवून खाण्याची माहितीसुद्धा बाहेरच्या जगाला नव्हती, तेव्हा येथे उत्तमोत्तम पक्वान्ने शिजत होती.

लक्षावधी वर्षांची  प्राचीनतम संस्कृती भारतवर्षात  नांदत होती. ते तेव्हाचे भारतवर्ष अरबस्तानापासून श्यामदेश, सिंहपूर आणि जावा-सुमतरापर्यंत  पसरलेले होते. गांधारदेश, केकय देश, खाल्डय देश, बाल्हिक देश, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश आणि श्रीलंका या सर्व  देशांपर्यंत भारतीय संस्कृतीच होती. या संपूर्ण  प्रदेशाला ‘आर्यभूमी ’ म्हणतात. या आर्य भूमीचे आता पाच-पंचवीस तुकडे झाले आहेत. उदार नकर्तेपणामुळे ते आणखी किती होतील, याविषयी सांगता येत नाही. तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर हिचे ३ तुकडे झाले आहेत.

६. सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण

भारतभूमीतील आर्य समाज मुळापासूनच अत्यंत श्रेष्ठ गुणांनी युक्त आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह आणि दया, माया, प्रेम, त्याग, शांती, अक्रूरता अन् सर्वांभूती भगवद्भाव, मृदूता, लज्जा, स्थिरता, तेजस्विता, क्षमा, धैर्य, पवित्रता, निरभिमानिता, परोपकारिता इत्यादी गुण या सुसंस्कृत समाजात स्थायीभूत झालेले आहेत.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/807676.html