निवासी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
सिंधुदुर्ग – महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांतील कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास १ जुलै या दिवशी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. या वेळी मागण्या मान्य न झाल्यास ६ ऑगस्टपासून वरील संस्थांतील सर्व कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करतील, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती आणि नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती यांनी निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे.
संघटनांनी निवेदनाद्वारे केलेल्या काही मागण्या…
१. राज्यातील ज्या ग्रामपंचायती नगरपंचायती झाल्या आहेत, त्या नगरपंचायतीमध्ये त्या ग्रामपंचायतीच्या कायम सेवेत असलेल्या कर्मचार्यांना विनाअट तातडीने सामावून घ्यावे.
२. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांतील कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे, तसेच त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे.
३. सेवानिवृत्त होऊन १-२ वर्षे झाली, तरी सेवानिवृत्त कर्मचार्यांना देय असलेली रक्कम तातडीने व्याजासह द्यावी.
४. महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या कर्मचार्यांचे वेतन प्रतिमास ५ तारखेपूर्वी देण्यात यावे.
५. वर्ष २००५ नंतर कायम झालेल्या; परंतु सेवेत असतांना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन लागू करावे.