संपादकीय : भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान !

नालंदा विद्यापीठ

ज्या विद्यापिठात एकाच वेळी जगभरातील १० सहस्र विद्यार्थ्यांना १ सहस्र ५०० शिक्षक शिकवायचे, ज्यात विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था ही विनामूल्य होती, ज्या विद्यापिठात धर्म, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, चित्रकला, वास्तूशास्त्र, धातूशास्त्र, अर्थशास्त्र यांसह आयुर्वेदाचे अत्यंत सखोल ज्ञान दिले जात असे, अशा परकीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लुप्त झालेल्या नालंदा विद्यापिठाचा ८२५ वर्षांनंतर परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जून या दिवशी प्रारंभ करण्यात आला. खरे पहाता प्राचीन काळी अखंड भारताच्या कानाकोपर्‍यात शिक्षणाची असंख्य केंद्रे वसलेली होती. अगदी लहान-लहान विद्याकेंद्रे तर कितीतरी होती, त्याची गणतीच नाही. यांतील बहुतांश विद्याकेंद्रे आसुरी वृत्तीच्या तत्कालीन मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त करून टाकली. ज्ञानकेंद्रांच्या या अपरिमित हानीचे दुष्परिणाम केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग आज पदोपदी भोगत आहे. ज्या प्रकारे परकीय आक्रमणांच्या खुणा पुसून टाकून अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभे राहिले, अगदी त्याच प्रकारे भारतीय संस्कृतीचे एक रत्न असलेले नालंदा विद्यापीठ चालू होणे, हा गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी क्षणच आहे !

नालंदाचा दैदीप्यमान इतिहास !

आज परदेशातील ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापिठे सर्वाेत्कृष्ट समजली जातात; मात्र काही शतकांपूर्वी चित्र वेगळे होते. भारतातील अशी अनेक विद्यापिठे जगप्रसिद्ध होती. त्यांपैकीच एक म्हणजे नालंदा विद्यापीठ होय ! ४ थ्या शतकाच्या मध्यात मगधचे महाराज शकादित्य यांनी त्यांच्या काळात नालंदा येथील जागा विद्यापिठाच्या रूपात विकसित केली. या विद्यापिठाचे आरंभीचे नाव होते ‘नलविहार’ ! नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचे एक पुष्कळ मोठे संकुल होते. ‘रत्नसागर’, ‘रत्नोदधी’ ‘रत्नरंजक’ अशा नावांच्या इथे इमारती होत्या आणि ‘मान मंदिर’ हे सर्वांत उंच प्रशासकीय भवन होते. या विद्यापिठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे, अशी याची ख्याती होती. येथे अनेक दुर्लभ आणि दुर्मिळ ग्रंथ यांचा प्रचंड मोठा संग्रह होता. येथील ग्रंथालय ९ मजली होते आणि त्यात ९० लाखांपेक्षा अधिक ग्रंथ होते. अनेक परकीय यात्रेकरूंनी या विद्यापिठाचे भरभरून कौतुक केले आहे.

ज्या विद्यापिठातील निष्णात वैद्य आचार्य राहुल यांनी तुर्की शासक इख्तियारुद्दीन महंमद बिन बख्तियार खिलजी याला दुर्धर आजारातून बरे केले, त्याची परतफेड अल्लाउद्दिन खिलजी याने वर्ष ११९९ मध्ये नालंदा विद्यापीठ आगीच्या भक्ष्यस्थानी देऊन केली. या विद्यापिठात इतके ग्रंथ होते की, अल्लाउद्दिन खिलजीने लावलेली आग ६ महिने धुमसत होती. खिलजीने केवळ विद्यापिठास आग लावली, असे नाही, तर विद्यापिठातील सर्व शिक्षकांना ठार मारले. या बौद्धिक आक्रमणामुळे भारताची अपरिमित हानी झाली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !

नालंदा विद्यापीठ

काँग्रेसची सत्ता जाऊन भाजप सत्तेत आल्यावर या विद्यापिठाचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी १९ सप्टेंबर २०१४ या दिवशी याची पायाभरणी केली होती. वर्ष २०१७ मध्ये याच्या प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ झाला. उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना असणारे ‘शून्य’ टक्के कार्बन उत्सर्जन असणारे हे विद्यापीठ ४५५ एकर परिसरात विस्तीर्ण परिसरात उभे करण्यात आले आहे. हे विद्यापीठ नालंदाचे जे प्राचीन अवशेष आहेत, त्या परिसरात असून ते ‘पंचामृत’ सूत्रीवर आधारित सिद्ध करण्यात आले आहे.

भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम या १७ देशांनी विद्यापिठाच्या समर्थनार्थ सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. म्हणजे हे विद्यापीठ वैश्विक आहे, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे वर्ष २०२३ मध्ये देहली येथे झालेल्या ‘जी २०’ संमेलनात नालंदा विद्यापिठाचे भव्य चित्र उभारण्यात आले होते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ हीच मुख्य संकल्पना या विद्यापिठाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या विद्यापिठाच्या चित्रासमोरच अनेक राष्ट्राध्यक्षांनी छायाचित्रे काढली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी गतवर्षीच त्यांच्या भविष्यातील योजना जगापुढे ठेवून भारतीय संस्कृतीची कशा प्रकारे जपणूक केली जाणार आहे, याची चुणूकच दाखवली होती.

नुकतेच ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने ‘परकीय आक्रमकांचा इतिहास शिकवण्याची आवश्यकता नाही’, अशी भूमिका घेत मोगल साम्राज्याचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावरून हेच लक्षात येते की, भारतात भव्य विद्यापिठे उभारणे आवश्यक आहेच; मात्र त्याहून अधिक भावी पिढी नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करणारा, तसेच त्यांना स्वयंपूर्ण करणारा अभ्यासक्रमही शिकवणे अत्यावश्यक आहे. हाच कित्ता सर्वत्र गिरवला गेल्यास विद्यार्थ्यांनाही योग्य आणि आवश्यक असे शिक्षण मिळेल !

भारतीय संस्कृतीचे जतन हवे !

प्राचीन भारत हा शिक्षणक्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. ‘विद्यापीठ’ ही संकल्पना भारतानेच जगाला सर्वप्रथम दिली. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत. कालांतराने हे सर्व लुप्त झाले आणि वैभवशाली इतिहासाचा वारसा असलेला भारत पाश्चात्त्य मेकॉलेच्या इंग्रजाळलेल्या निरुपयोगी शिक्षणपद्धतीच्या विळख्यात अडकला. यामुळे प्रत्येक क्षेत्रात भारताची दुर्गती झाली. नालंदासारख्या विद्यापिठांच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोरही सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने परदेशात जाणारी तरुणाई भारतातच राहील ! त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विदेशी आस्थापनांसाठी न होता भारत सक्षम होण्यासाठी होईल ! त्यामुळे भारताला परत एकदा विश्वगुरु बनायचे असेल आणि प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीला खर्‍या अर्थाने गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर विद्यापिठांप्रमाणेच भारतीय संस्कृतीचे जतन आणि तिचे पुनरुज्जीवन करण्याकडेच भर द्यावा लागेल. मेकॉले शिक्षणपद्धत झुगारून सुसंस्कारी पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबावी लागेल. राष्ट्रप्रेमी, सदाचारी अशी युवा पिढी घडल्यास भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही.

राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारी युवा पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबल्यास भारत निश्चितच विश्वगुरु होईल !