१. सृष्टीच्या मुळाशी नेणारे ज्ञान शिष्याला देणारे सद्गुरु !
सृष्टीतून उपलब्ध होत असलेले कुठलेही ज्ञान कितीही सखोल असो वा आकाशात भरारी घेणारे असो, सृष्टीच्या मुळाशी कधीच जाऊ शकत नाही. सद्गुरु आपल्या शिष्याला नेमके मूळच गवसून देतात.
२. विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होणारी ‘वस्तू’ स्वयंभू सुखकारी असणे
उच्च विचार, म्हणजे विचारच कुठून आणि कसे निर्माण होतात ? त्यांचाच उगम आणि विस्तार शोधायचा. तो शोध लागताच स्वतःकडे, तसेच विश्वाकडे पहाण्याची दृष्टी बदलते. विचारांच्या मुळाच्या शोधातून जी ‘वस्तू’ प्राप्त होते, ती स्वयंभू सुखकारी अशी असते.
३. ज्याने आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशा परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले असणे
बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते. या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)