न्‍यायालयाची छगन भुजबळ यांना चेतावणी !

कलिना मध्‍यवर्ती ग्रंथालय भूखंड घोटाळा प्रकरण  !

सुनावणीला उपस्‍थित रहा, अन्‍यथा वॉरंट काढू !

मुंबई – आपणाला आधीच पुरेशी संधी देण्‍यात आली आहे. सुनावणीच्‍या अनेक दिनांकांना तुम्‍ही अनुपस्‍थित राहिला आहात. पुढील सुनावणीला उपस्‍थित रहा. अन्‍यथा वॉरंट बजावले जाईल, अशी चेतावणी मुंबई सत्र न्‍यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. कलिना मध्‍यवर्ती ग्रंथालयाच्‍या भूखंड घोटाळ्‍याप्रकरणी न्‍यायालयाने ही चेतावणी दिली आहे.

छगन भुजबळ राज्‍याचे सार्वजनिक बांधकाममंत्री असतांना राज्‍य मध्‍यवर्ती ग्रंथालयाच्‍या उभारणीच्‍या कंत्राटात अपहार झाल्‍याचे उघड झाले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांसह ६ जणांवर गुन्‍हा नोंदवला आहे. याविषयी मुंबई सत्र न्‍यायालयात सुनावणी चालू आहे. ही सुनावणी पुढे ढकलण्‍याची मागणी छगन भुजबळ यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी १४ जून या दिवशी न्‍यायालयात केली. त्‍यावर न्‍यायालयाने वरील शब्‍दांत छगन भुजबळ यांच्‍या चेतावणी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जून या दिवशी आहे.