वैष्‍णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा यवतमाळ येथे विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने निषेध !

पुतळा दहन करून निषेध करतांना धर्माभिमानी

यवतमाळ, १६ जून (वार्ता.) – जम्‍मू-काश्‍मीर मधील वैष्‍णोदेवी येथे जाणार्‍या कटारा ते शिवखोडी दरम्‍यान यात्रेकरूंच्‍या बसवर आतंकवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड आक्रमणात १० निष्‍पाप हिंदु यात्रेकरू मारले गेले. या घटनेचा तीव्र निषेध विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने १२ जून या दिवशी यवतमाळ येथे करण्‍यात आला. या वेळी आतंकवादाचा प्रतीकात्‍मक पुतळा दहन करून आतंकवादाच्‍या विरोधात घोषणा देण्‍यात आल्‍या, तसेच या वेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या द्वारे राष्‍ट्रपतींना मागण्‍यांचे निवेदन पाठवण्‍यात आले.

आतंकवादी कारवाया नियंत्रित करण्‍यासाठी कठोर पावले उचलावीत, आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांवरही कडक कारवाई करावी, वैष्‍णोदेवीच्‍या भक्‍तांना संरक्षण देण्‍यात यावे, या मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले. या वेळी विहिंपचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोज औदार्य, जिल्‍हा सहमंत्री श्री. विनोद सानप, शहराध्‍यक्ष श्री. गोविंद मोरे, नगरमंत्री श्री. विवेक सज्‍जनवार, दुर्गा वाहिनीच्‍या विदर्भ प्रांत सहसंयोजिका कांचन जुगनाके, हिंदु जनजागृती समितीचे जिल्‍हा समन्‍वयक श्री. मंगेश खान्‍देल, बजरंग दल विभाग संयोजक श्री. भूपेंद्रसिंह परीहार, जिल्‍हा संयोजक श्री. योगिन तिवारी यांच्‍यासह अनेक कार्यकर्ते उपस्‍थित होते.