हडपसर (पुणे) येथे श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्‍यांच्‍या मुक्‍कामाची सिद्धता !

वारकरी

पुणे – संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद़्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘योगिनी एकादशी’ला (२ जुलै या दिवशी) हडपसर येथे मुक्‍कामी असणार आहेत. एकाच दिवशी दोन्‍ही पालख्‍या मुक्‍कामी असल्‍याने दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्‍येने गर्दी होत असते. त्‍यांना चांगल्‍या सुविधा कशा देता येतील, यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांची आढावा बैठक राष्‍ट्रीय काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी आयोजित केली होती.

विविध मागण्‍या आणि उपाययोजनांची बैठकीमध्‍ये चर्चा ! 

बैठकीमध्‍ये पालखी सोहळ्‍यात होणारा माशा आणि डास यांचा उपद्रव थांबवण्‍यासाठी साखर गोळ्‍या वाढवाव्‍यात, औषध फवारणी करावी, मुख्‍य मार्गांसह पदपथावरील अतिक्रमणे काढावीत, पाणीपुरवठा वाढवावा, आरोग्‍य सुविधा केंद्रे आणि फिरत्‍या स्‍वच्‍छतागृहांची संख्‍या वाढवावी, वारकर्‍यांना लागणार्‍या औषधांचे वाटप करावे. वारकर्‍यांना देण्‍यासाठी समाजातील नागरिकांकडून, विविध संस्‍था, संघटना, मंडळांकडून केळी वाटप केले जाते, त्‍यावर नियंत्रण ठेवावे, रस्‍त्‍यावर उभारले जाणारे व्‍यासपीठ नसावे, तेथे लावण्‍यात येणार्‍या ध्‍वनीक्षेपकांचा आवाज मर्यादित असावा, कर्णकर्कश पिपाणी विक्रेत्‍यांना बंदी घालावी अशा मागण्‍या आणि उपाययोजनांची चर्चा या बैठकीमध्‍ये करण्‍यात आली.

परतीच्‍या वेळेचा मुक्‍काम पूर्ववत् चालू ठेवावा !

पंढरपूरहून परतणारा जगद़्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसर येथे मुक्‍कामी रहात असे; परंतु काही वर्षांपूर्वी सोहळ्‍याने हा परतीचा मुक्‍काम बंद केला आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी तो पुन्‍हा चालू करावा, अशी विनंती आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.

पालखी मार्गांवरील वाल्‍हे येथील रस्‍त्‍यांची उंची वाढवण्‍यास विरोध !

पंढरपूर पालखी महामार्ग विस्‍तारीकरणास वाल्‍हे गावच्‍या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. वाल्‍हे गावच्‍या प्रवेशाला १० फूट उंचीचा भराव टाकून रस्‍ता करण्‍याचा प्रयत्न ‘राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने चालू केला.