दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन !

उच्च न्यायालयाने आदेश देऊन एक महिना उलटूनही प्रशासन निष्क्रीय !

मंदिर संस्थानच्या कार्यालयासमोर आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात घोटाळे करणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने देऊन एक महिना उलटला आहे; मात्र अद्यापही प्रशासनाकडून गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आलेले नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज श्री तुळजाभवानी मंदिराबाहेरील मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटना यांनी घंटानाद आंदोलन केले.

मंदिर संस्थानच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, ‘पुजारी मंडळा’चे सदस्य श्री. विजय भोसले, ‘जनहित संघटने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय (भैय्या) साळुंके, ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन साळुंखे, ‘हिंदु जनजागृती समिती’चे सर्वश्री राजन बुणगे, अमित कदम, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर, संदीप बगडी, सुरेश नाईकवाडी, किरण लोंढे, सूरज लोंढे, श्रीमती पुनाताई होरडे, सौ. कल्पना क्षीरसागर यांसह मोठ्या संख्येने देवीभक्त उपस्थित होते.

वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. ९ मे २०२४ या दिवशी उच्च न्यायालयाने तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला; मात्र त्यास एक महिना उलटला तरीही प्रशासन निष्क्रीय आहे. ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे नोंदवले नाहीत, तर न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करू, तसेच राज्यभर तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?