दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इकबाल कासकर खंडणीप्रकरणी निर्दोष ! ; पिण्याच्या पाण्याच्या ‘फिल्टर’मध्ये आढळली माती आणि शेवाळं !…

इकबाल कासकर खंडणीप्रकरणी निर्दोष !

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि इकबाल कासकर

ठाणे – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याची ठाणे न्यायालयाने खंडणीप्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच्यावरील आरोपाचे सबळ पुरावे पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाहीत. साक्षीपुराव्या अभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

पनवेल येथील मॉलच्या चित्रपटगृहातील प्रकार !

पिण्याच्या पाण्याच्या ‘फिल्टर’मध्ये आढळली माती आणि शेवाळं !

पनवेल – येथील ‘ओरियन’ मॉलमधील चित्रपटगृहात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ‘फिल्टर’मध्ये मातीचा थर आणि शेवाळजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपस्थितांनी हा प्रकार व्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिल्यावर ‘फिल्टर’ची स्वच्छता न झाल्यानेच त्यांनी मान्य केले, तसेच यापुढे असा हलगर्जीपणा होणार नसल्याचे सांगून त्यांनी नागरिकांची क्षमा मागितली.

‘यु.पी.एस्.सी.’साठी अर्धा घंटा आधी उपस्थित रहावे लागणार !

मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (यु.पी.एस्.सी.) १६ जून या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा घंटा आधी उपस्थित रहाणे अनिवार्य असल्याची सूचना मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. या परीक्षेसाठी मुंबईत एकूण ३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. १४ सहस्र ५०९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी २.३० ते ४.३० या २ सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे.