थोरले बाजीराव पेशवे यांच्या श्रीवर्धनमधील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करावे ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री

थोरले बाजीराव यांचा पुतळा

मुंबई – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या नियोजित बांधकामाचा महिला आणि बाल विकासमंत्री अन् रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १४ जून या दिवशी मंत्रालयात आढावा घेतला. ‘भावी पिढीला प्रेरणादायी असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारावे’, अशी सूचना आदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली. या बैठकीला रायगड जिल्हा परिषद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हे काम गतीने पूर्ण करण्याची सूचनाही या वेळी आदिती तटकरे यांनी दिली.

अनेक वर्षे रखडले आहे काम !

पुतळ्याच्या परिसरातच्या तटबंदीची कोसळलेली कमान

वर्ष १९८८ मध्ये श्रीवर्धन नगर परिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा कांस्य धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता, तसेच या परिसराला तटबंदीही करण्यात आली होती. सद्य:स्थितीत येथील तटबंदी ढासळली आहे. नगर परिषदेने उभारलेली कमानही तुटली आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर मेघडंबरी नाही. पुतळ्यावर धूळ साचत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन स्थानिक आमदार सुनील तटकरे आणि भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक झाली. या वेळी श्रीवर्धन येथे थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मारक उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले. यामध्ये संग्रहालय, सभागृह आणि बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारणे आणि परिसराचा विकास करणे, ही कामे करण्याचे निश्‍चित करण्यात आले; मात्र त्यानंतर पुढे त्याची कार्यवाही झाली नाही.

थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान !

छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्यासमवेत थोरले बाजीराव, म्हणजेच बाळाजी विश्‍वनाथ भट यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गाजवणार्‍या या वीरपुरुषाचे जन्मस्थान आणि मूळ घर श्रीवर्धन येथे आहे; मात्र अनेकांना हे माहितीही नाही.