हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांची सदिच्छा भेट !

डावीकडून श्री. विनोद रसाळ, श्री. राजन बुणगे, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, श्री. संजय साळुंखे, कु. वर्षा जेवळे

सोलापूर, १४ जून (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांची १३ जून या दिवशी सदिच्छा भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा यासंदर्भात कशा पद्धतीने प्रसाराचे आयोजन नियोजन करावे ?’, याविषयी चर्चा झाली. या वेळी ‘पूर्वभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे अध्यक्ष श्री. संजय साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, तसेच समितीच्या कु. वर्षा जेवळे, श्री. विनोद रसाळ हे उपस्थित होते.

या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. प्रकाश महानवर यांना ‘तणाव मुक्तीसाठी उपाययोजना’, ‘रूढी परंपरा जपणे यांसाठी प्रयत्न करणे’, ‘ग्रह तारे यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो ? याविषयीचे संशोधन’, तसेच ‘मंदिरात बसल्यानंतर होणारे सकारात्मक परिणाम’, यासंदर्भातील माहिती दिली.

यावर डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, ‘‘तुम्ही विद्यापिठामध्ये असे उपक्रम कधीही घेऊ शकता. तुमचे नेहमीच स्वागत आहे. अशा चांगल्या उपक्रमांसाठी आम्ही विद्यापिठामध्ये निश्‍चितच चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ. एवढेच नव्हे, तर जागतिक स्तरावरही उपयुक्त ठरणार्‍या गोष्टींसाठी जे उपक्रम असतील, त्यासाठीही आम्ही सोयी उपलब्ध करून देऊ. आज ‘आजीचा बटवा’ आणि ‘आयुर्वेद’ यांविषयीही प्रबोधन करणे आवश्यक असून त्याविषयी संशोधन करून ते वैज्ञानिक भाषेमध्ये सांगितले, तर ते समाजाच्या हिताचे आहे.’’