Indian Suicide Drone ‘Nagastra-1 : ‘भारतीय सैन्याला मिळाले पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन ‘नागास्त्र -१’ !  

नवी देहली – भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत. ४ सहस्र ५०० मीटर उंचीवर उड्डाण करू शकणारे हे ड्रोन शत्रूचे बंकर, चौक्या, शस्त्रांचे साठे नष्ट करू शकतील. सैन्य आत्मघाती ड्रोनला ‘लोइटरिंग मुनिशन’ म्हणतात. हे ड्रोन्स ‘इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनी’ आणि ‘झेड मोशन ऑटोनॉमस सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी बनवले आहे. दोन्ही आस्थापने सोलर इंडस्ट्रीजची उपआस्थापने आहेत.

एकूण ४५० नागास्त्रे सैन्याला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या सीमेजवळील लडाखच्या नुब्रा खोर्‍यात त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नागास्त्र स्थिर पंख असलेले ड्रोन आहेत. ते एका वेळी ६० मिनिटे उडू शकते. त्यात एक किलो वजनाची स्फोटके वाहून नेले जाऊ शकतात. त्यांचा स्फोट २० मीटरचा परिसर नष्ट करू शकतो.