भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. २२.५.२०२४ या दिवशी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख आणि मी यांची भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी अनौपचारिक भेट झाली. या भेटीमध्ये देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांचे सूक्ष्म परीक्षण झाले. त्यातून भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचे देवाने उलगडलेले विविध आध्यात्मिक पैलू आणि गुणवैशिष्ट्ये येथे लेखबद्ध केली आहेत. हा लेख मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी गुरुमाऊली आणि आम्हा सर्वांचे भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्या पावन चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.
(हा लेख प्रा. सु.ग. शेवडे संत होण्यापूर्वीचा आहे. – संकलक)

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

१. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्या चेहर्‍यावर निरागसता जाणवणे

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांच्या चेहर्‍यावर लहान बाळाच्या चेहर्‍यासारखा निरागस भाव जाणवला. मी देवाला याचे कारण विचारल्यावर देवाने सांगितले, ‘त्यांचे अंतर्मन लहान बाळाप्रमाणे निरागस आणि निर्मळ आहे. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर निरागस भाव जाणवतात. त्यांच्यातील निरागसतेमुळे त्यांचे बोलणे ऐकत असतांना आनंद जाणवतो.’

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचे बोलणे ऐकत असतांना उत्साह वाढून हिंदु धर्माप्रतीचा अभिमान वाढणे

त्यांच्या मनात धर्मसेवा करण्याची प्रचंड तळमळ असल्यामुळे त्यांचे बोलणे ऐकल्यावर उत्साह वाढून आपण भारावून जातो. त्यांचा उत्साह पाहून मला सुप्रसिद्ध मराठी लेखक श्री. विठ्ठल घाटे यांच्या पुस्तकाचे शीर्षक आठवले, ‘पांढरे केस, हिरवी (तरुण) मने’, म्हणजे ‘एखाद्या व्यक्तीचे शारीरिक वय वाढले असले, तरी तिचे मन तरुण असते.’ हे वाक्य भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना तंतोतंत लागू होते.

३. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्या सहवासात आनंद जाणवणे

देवाने मला सूक्ष्मातून सांगितले, ‘त्यांच्या अंतर्मनात भगवंताविषयी निस्सीम भक्ती आहे. ते भगवंताच्या अखंड अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात आनंदाचे कारंजे उडत असते. त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली असून ते संत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहवासात आनंद जाणवतो.’

४. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्यावर भगवंताची भरभरून कृपा असल्याचे जाणवणे

‘भारताचार्य शेवडे यांच्या हृदयात श्री नारायणीदेवी, मस्तकावर श्री गणेश आणि जिभेवर श्री सरस्वतीदेवी यांचा सूक्ष्मातून वास आहे’, असे मला जाणवले. त्यांच्यावर भगवंताची भरभरून कृपा आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीत गोडवा, विचारांमध्ये प्रतिभा आणि हृदयात भक्तीभाव जाणवतो. त्यामुळे त्यांचे प्रवचन ऐकून श्रोतेगण पुष्कळ प्रभावित होतात.

५. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्यामध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा सुरेख संगम असून त्यांच्याभोवती देवतांचे संरक्षककवच असल्यामुळे त्यांचे स्थूल अन् सूक्ष्म आक्रमणांपासून रक्षण होणे

भारताचार्य शेवडे यांच्यावर श्री हनुमान आणि श्री सरस्वतीदेवी यांची एकत्रित कृपा आहे. हनुमंताच्या कृपेमुळे त्यांच्या वाणीत क्षात्रतेज असून ती प्रसंगी धारदार शस्त्राप्रमाणे कार्य करते. त्यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज असून त्यांचे विचार आणि वाणी ज्ञानाने परिपूर्ण आहे. त्यांच्यावर त्यांची कुलदेवी श्री महालसादेवी आणि हनुमंत यांची कृपा असल्यामुळे त्यांच्याभोवती देवीत‌‌त्त्वाच्या मारक शक्तीचा लाल रंग अन् हनुमानाच्या धर्मतत्त्वाचा केशरी रंग यांचे २ इंच जाडीचे संरक्षककवच कार्यरत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांच्याभोवती चैतन्याचे पिवळसर रंगाचेही संरक्षककवच कार्यरत आहे. ‘त्यांच्याभोवती कार्यरत असलेल्या देवतांच्या या तारक आणि मारक कवचांमुळे त्यांचे सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती अन् स्थुलातून धर्मद्रोही यांच्या आक्रमणांपासून संरक्षण होते.

६. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्या सहवासात असतांना उत्साह आणि आनंद जाणवून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे

त्यांच्या सहवासात असतांना मला उत्साह आणि आनंद जाणवत होता. त्यांच्याकडून ज्ञानमय चैतन्य अन् आनंद यांच्या लहरींचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होत होते. ‘त्यांच्या आज्ञाचक्रातून पुष्कळ प्रमाणात धर्मतेज आणि चैतन्याचे किरण यांचे प्रक्षेपण होत असल्यामुळे संपूर्ण वायूमंडलाची शुद्धी झाली. त्यामुळे माझ्यावर आणि आश्रमातील त्यांच्या खोलीवर पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्यांच्या चरणांकडे पाहिल्यावर ‘हे पाद्यपूजेचे चरण आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली. याविषयी मी देवाला सूक्ष्मातून विचारल्यावर देवाने सांगितले, ‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे संत झाले आहेत.’

७. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची विविध योगमार्गांनुसार झालेली साधना !

८. श्री गुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला ज्ञानवृद्ध, कीर्तनातून भक्ती आणि तप केलेले तपोवृद्ध अन् ८९ वर्षांच्या वयोवृद्ध असणार्‍या भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचा अनमोल सत्संग लाभला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले. देवाने माझ्याकडून त्यांचे सूक्ष्म परीक्षण करून घेऊन त्यांची अनेक आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.

‘त्यांच्याप्रमाणे ज्ञानाची तीव्र जिज्ञासा माझ्यात निर्माण होऊ दे आणि मला श्री गुरूंना अपेक्षित अशी सूक्ष्म ज्ञानप्राप्तीची सेवा करता येऊ दे’, हीच श्री गुरुचरणी आर्त प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक