सर्व ठिकाणचे गुन्हे एकत्र करून खटला चालवा ! – जितेंद्र आव्हाड यांची मागणी

श्रीरामाविषयी वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण

न्यायालयाने मागवले सरकारचे मत !

मुंबई – प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ‘हे सर्व गुन्हे एकत्र करून खटला चालवण्यात यावा’, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाकडे केली आहे. यावर न्यायालयाने राज्य सरकारचे मत मागवले आहे.

आव्हाड यांच्या याचिकेवर १० जून या दिवशी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. हे सर्व गुन्हे ठाणे येथील वर्तकनगर किंवा नवघर पोलीस ठाण्यात वर्ग करावेत, अशी मागणी आव्हाड यांनी याचिकेत केली आहे.

काय होते वादग्रस्त विधान ?

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी महाराष्ट्रात मद्य आणि मांस विक्री बंदीची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली होती. त्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी ‘प्रभु राम हे आमच्यासारख्या बहुजनांचे होते. ते शिकार करून खाणारे होते. ते शाकाहारी नव्हते. १४ वर्षे जंगलात रहाणार्‍या व्यक्तीला शाकाहारी जेवण कुठे मिळेल ?’, असे वक्तव्य केले होते. यावरून वाद निर्माण होत असल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी या वक्तव्याविषयी क्षमा मागितली होती.