पालखी सोहळ्याच्या मुख्य समन्वयकपदी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची नियुक्ती !

पिंपरी (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा २९ आणि ३० जूनला पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात. त्याकरता अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे मुख्य समन्वयक आहेत, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी उपायुक्त नीलेश भदाणे आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी उपायुक्त रवीकिरण घोडके यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय उपचार केंद्र, शौचालये आदी सुविधा पुरवल्या जातात. त्या कामासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी समन्वयक अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली. समन्वयक अधिकारी वारीत पुरवण्यात येणार्‍या सुविधांचे नियोजन करतील.