संगीत उपासक गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा वसई (जिल्हा पालघर) येथे उत्साहात साजरा !

वसई (जिल्हा पालघर), १० जून (वार्ता.) – प.पू. (कै.) आबा उपाध्ये आणि प.पू. (कै.) (सौ.) मंगला उपाध्ये यांचे सुपुत्र अन् वसई येथील ‘समाज मंदिर ट्रस्ट’च्या संगीतवर्गाचे गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा येथील समाज मंदिर ट्रस्टच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. समाज मंदिर ट्रस्टच्या वतीने ९ जून या दिवशी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला श्री. उदयकुमार उपाध्ये यांचे नातेवाईक, हितचिंतक, संगीतप्रेमी आणि समाज मंदिर ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सोहळ्याच्या आरंभी सुवासिनींनी श्री. उदयकुमार उपाध्ये यांचे औक्षण केले. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित हितचिंतकांनीही श्री. उदयकुमार उपाध्ये यांचा सत्कार केला. यानंतर श्री. उदयकुमार उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. संगीतक्षेत्रातील प्रवासाविषयी अनुभव, तसेच ‘ॐ कार साधनेचा झालेला लाभ यांविषयी श्री. उदयकुमार उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांचे त्यांनी आभार व्यक्त केले. संगीत गायनाने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याला संगीतप्रेमींसह वसई येथील नागरिकही उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन म्हात्रे आणि त्यांच्या सहकारी यांनी पुढाकार घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने उदयकुमार उपाध्ये यांचा सन्मान !

अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वतीने सनातनचे साधक श्री. प्रवीण वर्तक यांनी श्री. उदयकुमार उपाध्ये यांना शुभेच्छापत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी श्री. प्रवीण वर्तक यांनी शुभेच्छापत्राचे वाचनही केले. संस्थेच्या वतीने सनातनचे साधक श्री. प्रशांत पाटील यांनी श्री. उपाध्ये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला, तर सनातनच्या साधिका सौ. मंगला राऊत यांनी श्री. उपाध्ये यांना भेटवस्तू प्रदान केली. श्री. उपाध्ये यांनी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार केला.

शुभेच्छापत्रात सनातनच्या ३ गुरूंनी वाहिलेली शब्दपुष्पे !

‘६ दशकांपूर्वी आपले पिता आणि गुरु प.पू. आबा यांनी आपणांस ‘ॐ’कार साधनेद्वारे संगीत साधनेस आरंभ करणाची दिशा दिली. संगीताकडे केवळ कला म्हणून नाही, तर साधना म्हणून पहाण्याची आध्यात्मिक दृष्टीही दिली. या साधनेद्वारे केवळ संगीतच नाही, तर आपली काव्य, लेखन आणि वक्तृत्व प्रतिभा जागृत होईल’, असा कृपाशीर्वादही प.पू. आबा यांनी आपणांस दिला. ‘सद्भावाची सेवेची दिव्य येथे प्रचीती ।’ या आपल्या गुरुकृपामय काव्यातून, तसेच आपल्या लिखाणातून आम्ही आपली काव्य-लेखन प्रतिभाही अनुभवली. गीतरामायणाद्वारे आपण श्रीरामाची कीर्तनसेवाही केली. वर्ष २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात आपण सादर केलेल्या गायनातून सनातनच्या साधकांनी अनेक आध्यात्मिक अनुभूतीही घेतल्या. प.पू. आबा यांच्या कृपाछत्राखाली आपण केलेल्या साधनेची ही प्रचीती होती. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘गुरुकृपेने समृद्ध झालेल्या आपल्या या प्रतिभेचा साक्षात्कार सर्वांना होवो आणि आपल्यावर श्रीगुरुकृपा अखंड राहो’, अशी ईश्वरचरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना करतो’, अशा शुभकामना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शुभेच्छापत्रामध्ये व्यक्त केल्या आहेत.