मंगलघटिकेचा घात !

प्रतिकात्मक छायाचित्र

विवाह म्हटला की, प्रत्येक वधू-वराला त्यात काहीतरी नाविन्य असावे, असे वाटते. त्यानुसार कपडे खरेदी असो किंवा अलंकार परिधान करणे किंवा विवाहसोहळा वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा करणे, या दृष्टीने भावी दांपत्य नियोजन करत असतात. अशाच स्वरूपाचा एक व्हिडिओ नुकताच प्रसारित झाला आहे. त्यात एका जोडप्याने स्वत:ला मागील बाजूने पेटवून घेत विवाहस्थळी प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे पेटत्या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. अन्य ठिकाणी अशा स्वरूपाचे ‘स्टंट’ (थरारक कृत्ये) केले जातात; मात्र विवाहासारख्या मंगलमय ठिकाणी असे प्रकार करणे अतिशय अयोग्य आणि धर्महानी ओढवून घेण्यासारखेच आहे. दोघांच्या सुरक्षिततेची या वेळी पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती; पण तरीही असे करणे धोकादायकच आहे. विवाह म्हणजे २ जिवांच्या नव्या आयुष्याचा प्रारंभ असतो; पण अशा मंगलमय प्रसंगी स्वतःला पेटवून घेणे, म्हणजे आयुष्याचा प्रारंभ स्वतःहूनच आग लावून पुसून टाकण्यासारखे नव्हे का ? थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आयुष्याचा मंगलमय प्रारंभ न करता स्वतःच स्वतःच्या वाटेत अग्नीची दाहकता निर्माण करण्याचाच हा प्रकार होय. विवाहात अग्नीला साक्षी मानून सप्तपदी चालली जाते, त्याच अग्निदेवतेची चारचौघात अशी उघड उघड विटंबना करणे, त्याची एक प्रकारे खिल्ली उडवणे हे कितपत योग्य ?

असे व्हिडिओ चित्रीत करणार्‍यांची तर चूक आहेच; पण सर्वाधिक दोषी जे अशा व्हिडिओंना ‘लाईक’ करतात (आवडले म्हणतात). असे व्हिडिओ अनेक ठिकाणी प्रसारित करून त्याचे अनावश्यक प्रसारण करतात, त्यांची चूक अधिक नव्हे का ? यामुळे अयोग्य कृतींना विनाकारण पाठबळ मिळते. अशा कृती करणे टाळायला हवे. याउलट अशा कृतींना किंवा व्हिडिओंना विरोध केल्यास त्यांच्या प्रसारणाला काही प्रमाणात तरी आळा बसेल ! बरे आताच्या काळातील लोक हा व्हिडिओ पाहून केवळ ‘लाईक’ करतील, असे नाही, तर ‘तो आपणही आजमावून पहावा’, असा विचार अनेकांच्या मनात डोकावून गेला असेल. असे पाऊल उचलण्यास आजची तरुण पिढी मागे-पुढे पहाणार नाही. तसे झाल्यास विषाची परीक्षा घेतल्यासारखेच होईल ! अशा प्रकारे घातक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एखादी चांगली किंवा समाजहितकारक कृती करून प्रसिद्धी मिळवणे हे केव्हाही चांगले ! तेच खरे विवाहपूरक ठरू शकते; पण अशा विचारांपर्यंत दुर्दैवाने कुणी पोचत नाही. याला कारणीभूत आहे धर्मशिक्षणाचा अभाव ! धर्मशिक्षण नसल्याने कोणत्याही धार्मिक कृतीची प्रसिद्धीसाठी अवहेलना करण्याचेच पाऊल अनेकांकडून उचलले जाते. प्रत्येकच जण आज धर्मशिक्षणापासून वंचित आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंनीच प्रयत्न करणे अपरिहार्य आहे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.