महाबळेश्वर येथील महाकाय होर्डिंग हटवले !

सातारा, ९ जून (वार्ता.) – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना धोकादायक होर्डिंग हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर नगरपालिका सीमेतील महाकाय होर्डिंग महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने हटवण्यात आले आहे.

सातारा जिल्हाधिकार्‍यांनीही संबंधित यंत्रणेला सक्रीय करत धोकादायक होर्डिंग हटवण्याविषयी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. महाबळेश्वर येथील नगरपालिका प्रशासक योगेश पाटील यांनी शहर आणि परिसरातील होर्डिंगची अधिकारी अन् कर्मचारी यांच्यासोबत पहाणी केली होती. ही होर्डिंग तातडीने काढून घेण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्यात आली होती; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महाबळेश्वर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट होर्डिंग हटवण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, महाड नाका, माखरिया उद्यान, वेण्णा दर्शन परिसर, लिंगमळा परिसर आणि इतर परिसरांतील १० होर्डिंग्ज हटवण्यात आली.