इस्लामाबाद (पाकिस्तान) – जगासमोर भीकेचा कटोरा घेऊन फिरणार्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठा धक्का बसला आहे. कर्जाविषयी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चालू असलेल्या चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही निकालाविना संपली. पाकिस्तानचे वर्तमानपत्र ‘ट्रिब्यून’मधील वृत्तानुसार, आयकरासह कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील वस्तूंवरील करांविषयी कोणताही करार झाला नाही, त्यानंतर नाणेनिधीने चर्चा थांबवली.
१. ‘ट्रिब्यून’ने म्हटले आहे की, पगारदार आणि पगार नसलेल्या करदात्यांच्या ४ लाख ६७ सहस्र रुपयांपेक्षा अधिक मासिक आयकरावर ४५ टक्के कर लावण्याविषयी चर्चा चालू आहे. सध्या पाकिस्तानमध्ये ५ लाख रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्नावर ३५ टक्के कर आहे.
२. नाणेनिधीच्या अटी पाकिस्तान सरकारने मान्य केल्या, तर त्याला जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार आहे. नाणेनिधी पुढील अर्थसंकल्पात निर्यातदारांवरील कर वाढवण्यासाठी पाकवर दबाव आणत असून त्यास पाकिस्तान सरकार सहमत आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक निवृत्तीवेतनावर कर लावण्याची इच्छा पाकिस्तानने नाणेनिधीकडे व्यक्त केली.