लंडन – येमेनजवळील एडनच्या आखातातील एका व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा दावा ब्रिटीश सुरक्षा आस्थापन ‘एम्ब्रे’ने नुकताच केला. या आक्रमणामुळे जहाजाला आग लागली. हे आक्रमण येमेनमधून झाले असून यामागे हुथी बंडखोर असल्याचा संशय आहे.
ब्रिटनच्या ‘मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ने सांगितले की, जहाजाच्या कॅप्टनने त्यांना या घटनेची माहिती दिली. हुथी बंडखोर गेल्या अनेक महिन्यांपासून लाल समुद्र, एडनचे आखात आणि अरबी समुद्र येथील व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. गाझामधील इस्रायलच्या आक्रमणाच्या विरोधात आणि पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ हुथी बंडखोर ही आक्रमणे करत आहेत.