गोरक्षण, हे हिंदूंसाठी भूमीकर्तव्य आणि धर्मकर्तव्यच आहे !

गोवंश हत्येचे भीषण परिणाम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘गोपालन करणार्‍या श्रीकृष्णामुळे त्या वेळी भारत समृद्ध होता. आता सर्वपक्षीय सरकारांनी सर्वत्र गोवंश हत्या करणारे कत्तलखाने उभारल्यामुळे भारत दरिद्री झाला आहे आणि देश देशोधडीला लागला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ‘गोपराष्ट्र’ किंवा ‘गोवराष्ट्र’ (गुराख्यांचे राष्ट्र) असा केलेला आढळतो. स्कंदपुराण, हरीवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख ‘गोपकपुरी’ किंवा ‘गोपकपट्टणम’ असाही केला आहे. म्हणजेच प्राचीन काळापासून ‘गोपालक राज्य’, अशी या गोमंतप्रदेशाची ख्याती होती. गोमातेच्या कृपेमुळेच या प्रदेशाला ‘गोवा’ हे नामाभिदान प्राप्त झाले आहे. आज याच गोमंतकात गोहत्यांचे दुष्टचक्र चालू आहे. म्हणूनच गोमंतकीय राज्यकर्ते आणि प्रजा यांचे ‘गोपालन, गोरक्षण आणि गोसंवर्धन करणे’, हे गोमंतकियांसाठी भूमीकर्तव्य ठरते.

हिंदु धर्मात गोमाता, गंगामाता आणि गीता यांचे मातृभावाने पूजन केले जाते. ब्रह्मांडातील ३३ कोटी देवतांची पवित्रके आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ गोमातेत आहे. तिचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्यच आहे. रघुवंशाचा श्रेष्ठ सम्राट दिलीप राजा याने गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःची मान सिंहाच्या मुखात दिली होती. गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी गोहत्या करणारा कसाई समोर येताच त्याचे दोन्ही हात कलम करून टाकले होते. १८५७ च्या पहिल्या उठावाला मंगल पांडे याची गोभक्तीच कारणीभूत ठरली होती. गोभक्तांनो, आजही गोरक्षणासाठी राजा दिलीपाप्रमाणे आपल्याला तन-मन-धनाचा त्याग करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे प्रसंगी कठोर व्हावे लागेल, तरच गोरक्षण होईल !

खरे तर सर्वत्र गोहत्याबंदी कायदा व्हावा, यासाठी गोभक्तांना मेळावे घ्यावे लागत असतील, आंदोलने-मोर्चे काढावे लागत असतील, तर ती एक शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही गोमातेच्या मानेवर असाच कसायाचा सुरा फिरत असे. महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच डोळ्यांतून मूकपणे आसवें गाळणार्‍या गोमाता आनंदाने हंबरू लागल्या. ‘गोहत्या बंद करा !’, अशी मागणी महाराजांकडे करावी लागली नाही कि निवेदने/स्वाक्षर्‍या गेल्या नाहीत. केवळ ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हिंदूद्वेष्ट्यांच्या उरात धडकी भरवायला पुरेशी ठरली ! गोभक्तांनो, केवळ गोहत्याबंदीचा कायदा करून उपयोग नसतो, तर गोपालक राज्यकर्ते असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले