पुणे – येथील सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर ६ जूनला सकाळी एका महिलेचा रेडी मिक्स सिमेंट टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. धायरी आणि वडगावमध्ये सिमेंट काँक्रिट सिद्ध करणारे सिमेंट प्लांट आहेत. या प्लांटमधून नेहमी भरधाव वेगाने मिक्स सिमेंट टँकर चालवले जातात. काही वेळा टँकरचालक मद्यपान करून टँकर चालवतात. त्यामुळे यापूर्वीही अपघात झाले आहेत. प्रयेजा सिटीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर टँकर किंवा ट्रक यांवर निर्बंध आहेत. तरीही संबंधित टँकरमालक ते झुगारून देतात. अशा बेपर्वाईमुळे एका निष्पाप महिलेचा जागीच मृत्यू झाला. (टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ? – संपादक) स्थानिक रहिवाशी अवजड वाहनांना रस्ता बंद करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. टँकर उताराच्या रस्त्यावरून खाली जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे.