हरियाणा येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. स्वरूप दुधगावकर याला आलेल्या अनुभूती !

१. प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाच्या वेळी त्यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती

कु. स्वरूप दुधगावकर

१ अ. मन निर्विचार होणे : ‘मी  रामनाथी आश्रमात असतांना एकदा प.पू. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) सत्संग असणार आहे’, हे समजल्यावर मला आनंद झाला. प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाचा अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे. प.पू. गुरुदेवांना पहातांना माझे मन निर्विचार झाले होते. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव वाढतच होता. मी प.पू. गुरुदेवांकडे सत्संगाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पहात होतो आणि त्यांचे निरीक्षण करत होतो.

१ आ. ‘गुरुदेवांच्या तेजस्वी चेहर्‍याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते : प.पू. गुरुदेव कक्षात आले, तेव्हा ते आनंदी आणि मोहक दिसत होते. सत्संगाच्या शेवटी ते अधिक आनंदी आणि तेजस्वी दिसत होते. ‘त्यांच्या तेजस्वी चेहर्‍याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

२. सत्संगात प.पू. गुरुदेव कृतीच्या स्तरावरील उपाय क्षणांत सांगत असलेले पाहून अचंबित होणे

सत्संगात काही साधक त्यांना साधनेत येणार्‍या अडचणी प.पू. गुरुदेवांना सांगत होते, काही साधक त्यांना आलेल्या अनुभूती, तर काही साधक स्वतःच्या मनातील शंका त्यांना विचारत होते. त्या प्रत्येकाला प.पू. गुरुदेव त्वरित उत्तर देत होते आणि योग्य उपाय सांगत होते. यावरून मला आठवले, ‘मी सेवा करतांना कधीकधी मला सुचायचे नाही. तेव्हा माझी सेवा पूर्ण होण्यासाठी प.पू. गुरुदेव मला नेहमी काहीतरी सुचवायचे किंवा दिशादर्शन करायचे आणि तेही लगेच.’ त्यांचे विचार आणि ते क्षणांत देत असलेले उपाय माझ्या मनात घुमत होते. सत्संगातही ते कृतीच्या स्तरावरील उपाय क्षणांत सांगत असलेले पाहून मी अचंबित झालो.

३. प.पू. गुरुदेवांना पाहिल्यावर ‘आपण सक्षम आहोत; म्हणून नाही, तर गुरुदेवांची कृपा आणि आपली पूर्वपुण्याई यांमुळे प्रत्येक कृती करू शकत आहोत’, हे सहसाधकाचे वाक्य सार्थ असल्याचे वाटणे

माझ्या समवेत सेवा करणारे सहसाधक नेहमी म्हणायचे, ‘सर्वसाधारण व्यक्ती जे करू शकत नाही, असे जे काही आपण करू शकतो, ते ‘आपण सक्षम आहोत’, म्हणून नाही, तर गुरुदेवांची कृपा आणि आपली पूर्वपुण्याई यांमुळे करू शकतो.’ प.पू. गुरुदेवांना पाहिल्यावर ‘सहसाधकांचे म्हणणे किती सार्थ आहे !’, हे माझ्या लक्षात आले.

४. सत्संगात एका साधकाची अनुभूती ऐकल्यावर श्रीकृष्णाने चिंतातुर अर्जुनाला सांगितलेले वाक्य आठवणे

सत्संगात एका साधकाने सांगितले, ‘‘रामनाथी येथील आश्रमात येण्याची आमची आंतरिक इच्छा आम्ही प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितली आणि सर्व त्यांच्यावर सोपवून दिले. त्यानंतर लवकरच पैशांची सोय झाली आणि आम्ही येथे येऊ शकलो.’’ त्या वेळी सहस्रो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने चिंतातुर अर्जुनाला सांगितलेले वाक्य मला आठवले, ‘तू केवळ चांगले कर्म करत रहा आणि बाकी सर्व माझ्यावर सोपव. फळाची चिंता करू नकोस, ते चांगलेच असेल.’

– कु. स्वरूप दुधगावकर (वय १६ वर्षे), हरियाणा

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक