Saudi Arabia & Israel Relations : सौदी अरेबियाने इस्रायलला शत्रूराष्ट्र संबोधणारे संदर्भ अभ्यासक्रमातून काढले !

सौदी-अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न

रियाध – अलीकडच्या काळात सौदी अरेबियाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इस्रायलच्या संदर्भात सकारात्मक पालटक करण्यात आला आहे. वर्ष २०२३-२०२४ या वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमधून ज्यूंच्या विरोधातील भाग काढून टाकण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर सौदी अरेबियाने इस्रायलला ‘शत्रू राष्ट्र’ संबोधणारे वक्तव्य अभ्यासक्रमातून काढून टाकले आहे. ‘इम्पॅक्ट से’ या स्वयंसेवी संस्थेने ही माहिती प्रसारित केली आहे. ही संस्था पश्‍चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील देश येथील शैक्षणिक अभ्यासक्रमांचा अभ्यास करते.

१. या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायलचे नाव अजूनही सौदी अरेबियाच्या पुस्तकांमधील नकाशांवर दिसत नाही. असे असले, तरी आता पॅलेस्टाईन हे नावही नकाशामधून काढून टाकण्यात आले आहे.

२. टाइम्स ऑफ इस्रायलच्या माहितीनुसार इस्रायलची ‘इन्स्टिट्यूट फॉर रिजनल फॉरेन पॉलिसीज’चे प्रमुख निमरोद गोरेन म्हणाले की, सौदी अरेबियाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. यावरून सौदी अरेबियाने इस्रायलच्या संदर्भातील विचारणीत पालट केल्याचे समोर येत आहे.