मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने एका खटल्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका भ्रष्टाचारी सरकारी कर्मचार्याचे निधन झाले, तेव्हा ‘पतीला भ्रष्टाचार करण्यापासून न रोखणे म्हणजे त्याने अनधिकृतपणे कमावलेल्या पैशांचा उपभोग घेतला’, असे सांगत न्यायालयाने पत्नीला १ वर्षाचा कारावास आणि १ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वर्ष २०१७ मध्ये पत्नी देवनायकीच्या पतीविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तिचा पती शक्तीवेलचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात शक्तीवेल यांची पत्नी देवनायकी यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते; मात्र न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले. निकाल देतांना मदुराई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘‘भ्रष्टाचार घरापासून चालू होतो आणि गृहिणी जर भ्रष्टाचारात सहभागी असेल, तर त्याला अंत नाही. सरकारी नोकराच्या पत्नीचे कर्तव्य आहे की, आपल्या पतीला लाच घेण्यापासून रोखणे. लाचखोरीपासून दूर रहाणे, हेच जीवनाचे मूळ तत्त्वज्ञान आहे. जर कुणी लाच घेतली, तर त्यांना ते भोगावे लागेल. या देशात भ्रष्टाचार अकल्पितपणे बोकाळला आहे. देवनायकीला गैरमार्गाने मिळालेल्या पैशांचा लाभ झाला आणि आता तिला शिक्षा भोगावी लागेल.’’ या शिक्षेला पत्नीने न्यायालयात दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे.
देशात लाच घेणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ आणि भारतीय दंड विधान संहिता कलम १७१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार लाच घेण्यासमवेत लाच देणेही गुन्हा आहे. वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचार निर्देशांक घोषित करण्यात आला, ज्यामध्ये भारत ४० गुणांसह ८५ व्या स्थानावर होता. यावरून आपल्या देशात भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकार्यांची संख्या अल्प नाही, हे स्पष्ट होते. शासकीय कार्यालयात कोणतेही काम तातडीने करून घ्यायचे असेल, तर आजच्या काळात लाच देण्याची जणू काही पद्धतच झाली आहे. शासकीय नोकराने लाच मागणे, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा आणि पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार अशा आर्थिक साधन संपत्तीचा हिशोब नसणे, साधनांच्या विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे हा गुन्हा आहे. अनेक वेळा याविषयी कुणीही तक्रार करत नाही.
न्यायालयाचा निर्णय सर्वांना लागू !
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने दिलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असून हा निर्णय देशातील लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला लागू होतो. शासनाचे १ ते दीड लाख रुपयांचे भरघोस वेतन, रहाण्यासाठी घर, महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग, वैद्यकीय खर्च आणि निवृत्त झाल्यानंतर मिळणारे निवृत्ती वेतन (पेन्शन) असे सर्वकाही असतांनाही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लाच घेऊन भ्रष्टाचार करत आहेत. आतापर्यंत देशात लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना पकडल्यानंतर त्यांच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक धाडी घालते, त्या वेळी डोळे पांढरे होतील, एवढा पैसा तेथे आढळून येतो. हा पैसा एवढा असतो की, तो मोजण्यासाठी यंत्र मागवावे लागते. हा पैसा घरातच ठेवल्याने याची माहिती अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला असते. असे असतांनाही हे सदस्य याविषयी कुठेच वाच्यता न करता या पैशांचा लाभ स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. या पैशांतून २५ ते ५० किलो सोने आणि चांदी यांचे दागिने घेणे, सदनिका, फार्म हाऊस, बागायती भूमी, शेती, मोठे बंगले, तसेच नातेवाइकांच्या नावांवर संपत्ती घेणे, असे अनेक प्रकार लाच घेणारे करत असतात. अधिकारी आणि कर्मचारी वेतनाव्यतिरिक्त एवढा पैसा कुठून आणतात ? ते हा पैसा कशा पद्धतीने मिळवतात ? हे न पहाता कुटुंबातील सदस्य या पैशांचा उपभोग घेतात. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे या कुटुंबातील सदस्य लाच प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांनाही शिक्षा करणे आवश्यक आहे. यासाठी देशात असा कायदा करणे आवश्यक आहे.
कायद्याची भीती नसणे !
लाच घेऊन भ्रष्टाचार केल्यामुळे देशाची आर्थिक वाढ आणि विकास यांस अडथळा निर्माण होऊन आतंकवाद, अवैध मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय, खंडणी इत्यादीसारख्या इतर भयंकर गुन्ह्यांचा जन्म होतो. लोभ भ्रष्टाचारास जन्म देतो. ज्यामध्ये जे लोक सत्तेत असतात त्यांनी स्वतःचा किंवा इतरांच्या लाभासाठी धोरणांवर आणि निर्णयांवर प्रभाव पाडला जातो, अशा गोष्टींची जाणीव कुणालाही नाही. रामराज्यात भ्रष्टाचार करणार्यास मोठा दंड दिला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही भ्रष्टाचार्यांना दंड दिला होता. भ्रष्टाचार करणे हे पाप आहे. हे पाप कसे आहे ? याची परतफेड कशी करावी लागते ? यातून मनुष्याचे देवाण-घेवाण कसे निर्माण होते ? भ्रष्टाचार केल्यामुळे पुढचा जन्म कोणता मिळतो ? मनुष्याला पुढील जन्मी कोणत्या यातना भोगाव्या लागतात ? याची सर्व माहिती धर्मशिक्षणातून मिळते; मात्र भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धत नष्ट केल्यामुळे या सर्व गोष्टींचा विसर मनुष्याला पडलेला आहे. त्यामुळे तो स्वतःच्या मनाला येईल तसे भ्रष्ट आणि अधर्माने वागत आहे. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार वाढला आहे. हे रोखायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन मनुष्याला सद्मार्गाला लावले पाहिजे. यासाठी संतांचा सत्संग आणि सहवास असणे आवश्यक आहे.
भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्याचसमवेत जगभरातील भ्रष्टाचारामुळे भारताचे नाव अपकीर्त झाले आहे. त्याचा आपल्या देशावर फार वाईट परिणाम होत आहे. भ्रष्टाचारामुळे विकासाचे जवळपास सर्वच मार्ग खुंटतात. भ्रष्टाचाराने जमा केलेल्या काळ्या पैशांचा थेट परिणाम महागाईवर होतो. देशातील मध्यमवर्गीय कुटुंबाला महागाईचा सर्वाधिक सामना करावा लागतो. अशा सर्व गोष्टींचा विचार करून कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कर्त्या व्यक्तीस भ्रष्टाचार करण्यापासून रोखले पाहिजे. आपली कर्ता व्यक्ती (पती, दीर, नणंद, जाऊ, सासू, सासरे वगैरे) नोकरी करतांना वेतन सोडून इतर अधिक रक्कम घरी आणत असेल, तर तिने १०० टक्के भ्रष्टाचार किंवा लाच घेतली आहे, असे समजावे. सदस्यांनी याला प्रतिबंध करावा. तरीही कर्ता व्यक्ती ऐकत नसेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. येथे सदस्यांनी राष्ट्र आणि देशहिताचा प्रथम विचार केला पाहिजे, तसेच भ्रष्टाचार करणार्यांना रोखणे, हे माझे कर्तव्य आहे, हे नागरिकांनी जाणले पाहिजे. असे केल्यास देश नक्कीच भ्रष्टाचारमुक्त होईल.
‘भ्रष्टाचार करणार्यांना रोखणे, हे माझे कर्तव्य आहे’, ही जाणीव ठेवून भारतियांनी कृती केल्यास देश भ्रष्टाचारमुक्त होईल ! |