प्रकल्प झाल्यास पूरस्थिती निर्माण होईल, असा दावा
सावर्डे, २ जून (वार्ता.) – मीराबाग- सावर्डे येथील प्रस्तावित ३० एम्एल्डी जलप्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. २ जूनला सकाळी मीराबाग, सावर्डे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात यासंबंधी बैठक झाली. या बैठकीसाठी सावर्डेचे आमदार गणेश गावकर, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक, कुडचडेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक, पंच शशिकांत नाईक, बाबू सावंत, नीलेश भंडारी, नगरसेवक टोनी फर्नांडिस, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही; कारण हा प्रकल्प झाल्यास पूरस्थिती भीती निर्माण होईल’ अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने झुवारी नदीवर बंधारा आणि जॉगिंग ट्रॅक सिद्ध करणे, यांसाठी २८० कोटी रुपयांची निविदा जारी केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांपैकी सुमित नाईक म्हणाले, ‘‘या बंधार्यासंबंधी आम्ही जलस्रोत खात्याच्या अभियंत्याना अनेक प्रश्न विचारले; परंतु आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता राज्य सरकार हा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असून ते आम्हाला मान्य नाही. पिण्याच्या पाण्याचे सूत्र उपस्थित करून या ठिकाणी पर्यटनस्थळ करण्याचा सरकारचा विचार असून याचा ग्रामस्थांना काहीच लाभ होणार नाही. उलट ते त्रासदायक ठरेल. या वेळी सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर म्हणाले, ‘‘लोकांना जर हा प्रकल्प नको असेल, तर मी लोकांसमवेत आहे. लोकांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या बैठकीला उपस्थित राहिलो. हा प्रकल्प लोकांसाठी धोकादायक आहे, असे दिसून आल्यास लोक जे सांगतील ते मी करणार आहे.’’