शुद्धलेखनाच्या चुका टाळल्याने लिखाणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘व्यक्ती भाषा बोलायला आपोआप शिकते; पण लेखन मात्र तिला प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. भाषेतील व्याकरण त्या भाषेच्या लेखनाचे प्रमाणीकरण करते आणि भाषेच्या योग्य वापराचे सूत्र शिकवते. त्यामुळे प्रत्येक भाषेमध्ये व्याकरण आणि शुद्धलेखन यांना विशेष महत्त्व आहे. व्याकरणातील काना, मात्रा, वेलांटी, तसेच त्यांचे र्‍हस्व अथवा दीर्घ उकार हे अर्थवाही आहेत. व्याकरणाच्या नियमांचे पालन झाले नाही, तर अनेकदा शब्द आणि वाक्य यांचे अर्थ योग्य रितीने कळत नाहीत. परिणामी त्यातून अयोग्य माहिती प्रसारित होते. व्याकरणाच्या प्रभावी वापरामुळे लेखन सुलभ आणि अर्थवाही होते.

 

‘अशुद्ध लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध केल्यानंतर त्यात कोणता पालट होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांमधील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येते.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणे

या प्रयोगासाठी एका मराठी पुस्तकातील व्याकरणदृष्ट्या १० ते १२ ओळींचे अशुद्ध लिखाण निवडण्यात आले. नंतर तेच लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध आणि संकलन करून त्याची चाचणी करण्यात आली. तसेच ‘वाचकांना अशुद्ध आणि शुद्ध या दोन्ही लिखाणांकडे पाहून काय जाणवते ?’ त्यांना कशा प्रकारची स्पंदने जाणवली ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करण्यात आला. या सर्व चाचण्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.

१ आ. ‘अशुद्ध आणि शुद्ध लिखाणाकडे पाहून काय जाणवते ?’, या सूक्ष्म-प्रयोगाचे उत्तर : या प्रयोगात १० व्यक्तींना ‘दोन्ही लिखाणाकडे एकेक करून पाहून काय जाणवते ?’, याचा सूक्ष्म-अभ्यास करण्यास सांगितले. पुढील सारणीतून लक्षात येते की, १० पैकी ७ जणांना अशुद्ध लिखाणाकडे पाहून त्रासदायक, तर शुद्ध लिखाणाकडे पाहून चांगले जाणवले.

२. चाचणीचे निष्कर्ष

अ. अशुद्ध लिखाणात पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली आणि सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

आ. हेच अशुद्ध लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध केल्यानंतर त्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

श्री. गिरीश पाटील

३ अ. अशुद्ध लिखाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार ज्या प्रकारचे लिखाण असेल, त्या प्रकारची स्पंदने त्यातून प्रक्षेपित होतात. त्यामुळे मूलतः अशुद्ध असलेल्या लिखाणामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

३ आ. शुद्ध लिखाणात नकारात्मक ऊर्जा न आढळता सकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : ‘संस्कृत’ या देवभाषेतून मराठी भाषेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेतील लिखाणामध्ये व्याकरणाच्या नियमांचे पालन केल्यास लिखाणात परिपूर्णता येऊन दैवी (सात्त्विक) स्पंदने आकर्षिली जातात. अशुद्ध लिखाण व्याकरणदृष्ट्या शुद्ध केल्यानंतर हाच परिणाम दिसून आला आणि त्या लिखाणात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे आढळले. यातून ‘शुद्धलेखनाच्या चुका टाळल्यास लेखातील सकारात्मक स्पंदने वाढतात’, हे लक्षात येते.

– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.२.२०२४)

इ-मेल : [email protected]

लिखाण करतांना त्या त्या भाषेतील व्याकरणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करा !

वाचकांना आवाहन

लिखाणामध्ये शुद्धलेखनाच्या चुका असल्या, तर त्यात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि त्या ऊर्जेचे प्रक्षेपण वाचकांवर होते. परिणामी अशा अशुद्ध लिखाणाचे वाचन करणार्‍या व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होऊन तिची सकारात्मक ऊर्जा न्यून होते किंवा नाहीशी होते. जे लोक अशा प्रकारच्या अशुद्ध लिखाणाचे प्रतिदिन वाचन करत असतील, त्यांच्यावर किती प्रमाणात नकारात्मक परिणाम होत असेल, याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळे कोणत्याही भाषेतून लिखाण करतांना व्याकरणाच्या नियमांकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे !’

– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.२.२०२४)

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.