Violence in Bengal : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या वेळी बंगालमध्ये हिंसाचार

भांगर येथे बाँबस्फोट, तर जयनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र लुटले !

नवी देहली – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाचा सातवा म्हणजेच शेवटचा टप्पा १ जून या दिवशी पार पडला. ८ राज्यांतील ५७ जागांसाठी या टप्प्यात मतदान झाले. या वेळी बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे बाँबस्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ भाजपकडून सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने पोस्ट करत माहिती दिली की, जमावाने जयनगरमधील बेनिमाधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसमध्ये असलेली राखीव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि आणि कागदपत्रे लुटली. तसेच ही यंत्रे येथील तलावात टाकण्यात आली.

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला की, राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर बसवण्यात आलेले वेब कास्टिंग कॅमेरे नादुरुस्त आहेत. यामध्ये डायमंड हार्बरमध्ये १४१, मथुरापूरमध्ये १३१, जॉयनगरमध्ये ९० आणि जाधवपूरमध्ये ६० कॅमेर्‍यांचा समावेश आहे.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, वाराणसीमध्ये लोकशाहीचा गळा घोटला गेला. तेथे उमेदवारांचे अर्ज रहित करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरणार्‍यांना निवडणूक आयोगाकडून कार्यालयातही प्रवेश दिला जात नव्हता. असे सलग ४-५ दिवस झाले. जर तुम्हाला (भाजपला) ठाऊक आहे की, लोक तुम्हाला साथ देतात, तर तुम्ही कशाला घाबरता ?

संपादकीय भूमिका 

बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हिंसाचार होतो, हे नवीन नाही. एकूणच बंगाल राज्य लोकशाहीसाठी लज्जास्पद ठरले आहे !