पिंपरी (पुणे) – माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीवरून उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ‘महावितरण’ने तळवडे शाखेतील अभियंता रमाकांत गर्जे यांना निलंबित केले आहे. ‘पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन’चे सचिव नितीन बोंडे यांनी माहिती अधिकार कायद्यातून भ्रष्टाचार उघडकीस आणला. ‘महावितरण’च्या भोसरी विभागीय कार्यालयाने तळवडे येथील एका इमारतीच्या ४० घरगुती आणि व्यापारी वीजजोडणी यांसाठी १२७ किलोवॅट वीजभार संमत केला होता. महावितरणाच्या एन्.एस्.सी. योजनेअंतर्गत १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून त्या ठिकाणी २०० केव्हीए क्षमतेचे ‘ट्रान्सफॉर्मर’ बसवण्याचे अंदाजपत्रकही संमत झाले होते; मात्र ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याचे काम झाले नसतांनाही अभियंता गर्जे यांनी ४० पैकी २२ वीजजोडण्यांना वीजमीटर बसवले. माहिती अधिकारात उघड झालेल्या माहिती अन्वये सर्व्हिस कनेक्शन चार्जेस (सेवा जोडणी शुल्क), अनामत रक्कम आणि ग्राहकांचा संमत लोड यांमध्ये फरक दिसून आला. तसेच ४० वीजजोडण्यांच्या घेतलेल्या शुल्कात आणि प्रत्यक्ष घ्यावयाच्या रकमेत ५ लाख रुपयांचा अपहार गर्जे यांनी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी बोंडे यांनी केली होती. अन्वेषणानंतर महावितरणने गर्जे यांचे निलंबन केले. (भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार रोखता येणार नाही, हे प्रशासनाने लक्षात घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)