सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना केलेले मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१ अ. हिंदु राष्ट्रात कुणालाही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही : ‘गुरुमाऊलीशी बोलत असतांना आम्ही (सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. राम होनप) त्यांना सांगितले, ‘‘सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करतांना वाईट शक्तींचा त्रास होतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता सूक्ष्मातील निर्णायक युद्ध चालू आहे. हे शेवटचे सूक्ष्म युद्ध आहे. यानंतर ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे. त्यामुळे तुमचा त्रास निघून जाणार. ‘हिंदु राष्ट्रा’त कुणालाही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही. ’’

१ आ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना संत होण्याचा दिलेला आशीर्वाद ! : आम्ही त्यांना सांगितले, ‘‘वाईट शक्तींच्या त्रासामुळे आमच्या साधनेत चढ-उतार होतात.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही आध्यात्मिक उन्नतीची काळजी करू नका. तुम्ही तिघेही (सुश्री (कु.) मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप) संत होणार आहात.’’

१ इ. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे निराळे आश्रम होण्याविषयी सांगितलेली सूत्रे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ इ १. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला ज्योतिषांनी सांगितलेले भविष्य ! : गुरुदेव आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हाला प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित पुष्कळ ग्रंथ सिद्ध झाले आहेत आणि तुम्ही साधकांना मार्गदर्शनही करता. त्यामुळे पुढे तुम्ही तुमचे आश्रम काढणार आहात का ?’’ तेव्हा श्री. राम होनप म्हणाले, ‘‘२ – ३ ज्योतिषांनी ‘भविष्यात तुमचे आश्रम होतील’, असे मला सांगितले आहे.’’ गुरुदेव स्मितहास्य करत म्हणाले, ‘‘माझे आश्रम तुमचेच आहेत.’’

१ इ २. वेगळा आश्रम किंवा संप्रदाय न होता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांशीच रहाता येण्यासाठी प्रार्थना होणे : हे बोलणे ऐकतांना माझ्या मनात तीव्रतेने विचार आले, ‘गुरुदेवा, मला निराळा आश्रम किंवा संप्रदाय नको. मला केवळ तुमच्या पावन चरणांशी फुलाप्रमाणे राहू दे. मला माझे निराळे अस्तित्व नको. मला तुमच्याच चरणांचा ध्यास राहू दे. मला तुमच्या पंखाखाली राहू दे आणि मला तुमच्या चरणांशी एकरूप होता येऊ दे’, एवढीच प्रार्थना आहे.’

२. सूक्ष्मातील ज्ञान मिळतांना जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला सूक्ष्मातील ज्ञान मिळतांना काय जाणवते ? ज्ञान मिळवतांना तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही कुठले उपाय करता ?’’ याविषयी मी त्यांना सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

२ अ. सूक्ष्मातील ज्ञान जन, तप आणि सत्य लोकांतील ऋषिमुनी देत आहेत’, असे जाणवणे : ‘ऋषिलोकातून एक ज्ञानी संत मला ज्ञान देत असून माझ्या हृदयातही एक आध्यात्मिक उन्नत विराजमान आहेत. ते हे ज्ञान ग्रहण करून त्याचे माझ्याकडून टंकलेखन करून घेतात’, असे मला जाणवते. आता मला मिळणारे ज्ञान उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक येथील नसून जन, तप आणि काही वेळा सत्य या लोकांतील ऋषिमुनी देतात’, असे मला जाणवते.

२ आ. ज्ञानप्राप्तीची सेवा करतांना वाईट शक्तींचा त्रास होणे, त्यावर विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि ‘संगणकाचा कळफलक, म्हणजे गुरुचरण आहेत’, असा भाव ठेवल्यावर त्यातून चैतन्य मिळून सेवा सहजतेने होणे : काही वेळा ज्ञानाच्या धारिकेचे टंकलेखन करण्यापूर्वी मला माझ्या डोक्यावर पुष्कळ दाब जाणवतो, ‘मनामध्ये विचारांचा गोंधळ जाणवून छातीत दुखणे किंवा काहीही न सुचणे’, असे त्रास होतात. तेव्हा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारते. ते नामजपादी उपाय केल्यावर मला सेवा करणे शक्य होते. काही वेळा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या अत्तरांचा सुगंध घेतल्यावर माझ्यावरील आवरण दूर होऊन मला सेवा करता येते, तर काही वेळा श्रीरामाचा नामजप लिहिल्यावरही मला बरे वाटून मी सेवा करू शकते. ‘संगणकाचा कळफलक (की बोर्ड) हे गुरुचरण आहेत’, असा भाव ठेवून टंकलेखन करतांना कळफलकातून चैतन्य येऊन ते माझ्या देहात जाते. त्यामुळे सेवा करतांना ज्ञानाची धारिका लीलया पूर्ण होते’, असे मला जाणवते.

२ इ. ज्ञानाच्या धारिकांचे लिखाण करतांना येणारी अनुभूती

२ इ १. सूक्ष्म ज्ञानाची धारिका लिहिल्यावर ती ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पडताळून दिली’, असे जाणवणे आणि धारिकेतून पिवळसर पांढर्‍या रंगाचा प्रकाश येतांना दिसून मनाला आनंद जाणवणे : सूक्ष्म ज्ञानाची धारिका लिहून पूर्ण झाल्यावर ती संगणकाच्या पडद्यावर पहातांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लगेच ती सूक्ष्मातून पडताळून दिली’, असे मला जाणवते. त्यामुळे मला ज्ञानाच्या धारिकेतून पिवळसर पांढर्‍या रंगाचा प्रकाश येतांना जाणवून मनाला आनंद मिळतो.

२ इ २. ज्ञानाच्या धारिकेचे टंकलेखन करतांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : ज्ञानाच्या धारिकांचे टंकलेखन करतांना माझ्या मनात भगवंताप्रती कृतज्ञताभाव असतो. मिळालेल्या ज्ञानाच्या प्रत्येक शब्दांतून मला आनंद मिळतो. ज्ञानाच्या धारिकेचे लिखाण पूर्ण झाल्यावर ‘मला आध्यात्मिक लाभ झाले’, असे जाणवून माझे शरीर आणि मन हलके होते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक