१. सौ. सुनिता देवकर, विशाखापट्टणम्
१ अ. ब्रह्मोत्सवाला जाण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. ‘मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवासाठी जायचे आहे’, असे समजल्यापासून मला पुष्कळ आनंद होत होता आणि माझ्याकडून आपोआपच कृतज्ञता व्यक्त होत होती. मला वाटत होते, ‘द्वापरयुगात श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यानंतर गोप-गोपी हातातील कामे सोडून श्रीकृष्णाजवळ जात असत. प.पू. गुरुदेव साधकांना बोलावत आहेत. माझी गोप-गोपींसारखीच स्थिती व्हायला हवी. माझी तशी स्थिती कधी बरे होणार ?’
२. आश्चर्य म्हणजे मला ज्या दिवशी प्रवासाला निघायचे होते, त्या दिवशी मला पहाटे स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘आकाश, चंद्र आणि चांदण्या सुंदर दिसत आहेत. आकाशात सप्तरंग आहेत. जणू काही ती रंगांची उधळण करणारी कोजागरी पौर्णिमा आहे.’ मी प्रवास करत असतांना त्या स्वप्नाची मला मला पुनःपुन्हा आठवण होत होती आणि मला पुष्कळ आनंद मिळत होता.
१ आ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. मी सोहळ्याच्या ठिकाणी पोचल्यावर मला ‘वैकुंठातच आले आहे’, असे वाटत होते. सोहळा पहात असतांना आणि रथ अन् सनातनचे तीनही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांचे दर्शन घेत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती.
२. मला सूर्यदेवाचे फार सुंदर दर्शन झाले. मला दिसले, ‘सूर्यदेव हा सोहळा जवळून पहात आहे.’ मला सूर्यदेवाला पाहून पुष्कळ आनंद झाला.’
२. सौ. भार्गवी, विशाखापट्टणम्
अ. ‘मी ब्रह्मोत्सव सोहळा पाहिल्यापासून मला पुष्कळ सकारात्मकता जाणवत आहे.
आ. सत्संगात गुरुदेव साधकांशी बोलत होते आणि त्यांना प्रोत्साहन देत होते. हे सर्व पाहून आताही माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. सकाळी उठताच आणि रात्री झोपण्यापूर्वी भगवंताला कृतज्ञता व्यक्त करायची, अशी मला सवयच झाली आहे.
इ. ‘मी प्रयत्नपूर्वक आत्मनिरीक्षण करत नसून ते आपोआप होत असते’, असे माझ्या लक्षात आले. पूर्वी मी थोडी त्रासलेली असे; मात्र आता माझा विश्वास बसला आहे की, ‘भगवंत सर्वांची काळजी घेणार आहे.’ ‘मी धन्य धन्य आहे’, असे मला वाटते. हे शक्य झाल्याबद्दल गुरुदेव आणि ब्रह्मोत्सवाचे आयोजक यांच्या प्रती कृतज्ञता !
३. सौ. लावण्या, इंदूर, तेलंगाणा
अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला आध्यात्मिक लाभही झाले.’
४. श्री. सूरी निकांक्ष, इंदूर, तेलंगाणा
अ. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मला वाटले, ‘मी सोहळ्यात सहभागी झाले आहे.’
आ. गुरुदेवांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
इ. मी डोळे बंद करून गुरुदेवांचे ध्यान केले. तेव्हा मला जाणवले, ‘गुरुदेव पुष्कळ विशाल झाले आहेत आणि ते मला पहात आहेत. मी त्यांच्या चरणांपाशी बसून त्यांचे विराट रूप पहात आहे.’
ई. गुरुदेवांच्या मंगल श्रीचरणांप्रती कोटीशः कृतज्ञता ! ‘हा अलौकिक कार्यक्रम पहाण्याचे सौभाग्य मिळाले’, याबद्दल सर्व साधकांनाही हृदयपूर्वक धन्यवाद !’
५. श्री. नरसिंहा चारी, करिमनगर, तेलंगाणा
अ. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यात गुरुदेवांना पाहिल्यानंतर माझे मन स्थिर झाले आणि मला आनंद झाला. मी रथारूढ गुरुदेवांना पाहिल्यावर मला वाटले, ‘ते श्रीकृष्णाप्रमाणे स्मितहास्य करत आहेत.’
आ. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साक्षात् देवी स्वरूपात दिसत होत्या.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |