३१ मे या दिवशीच्या भागामध्ये परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची भेट होण्यापूर्वी साधकाला होत असलेले कौटुंबिक त्रास, गुरुदेवांच्या प्रथम भेटीने ‘हेच आपले तारणहार आहेत’, अशी साधकाच्या मनाची झालेली धारणा, त्याच्या साधनेला झालेला आरंभ इत्यादी भाग पाहिले. या भागात गुरुदेवांनी ‘साधकांना कसे घडवले ?’, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांची अनुभवलेली प्रीती याविषयी पहाणार आहोत.
(भाग २)
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना घडवणे
४ अ. साधकांचा अहंकार न्यून होण्यासाठी त्यांना मुंबई सेवाकेंद्रातील स्वच्छता करायला सांगणे : एकदा त्यांनी आम्हाला मुंबई सेवाकेंद्राची स्वच्छता करायला सांगितली. आम्हीही उत्साहाने सेवेला लागलो. डॉ. (सौ.) कुंदाताई गुरुदेवांना म्हणाल्या, ‘‘मुलांना हे कशाला करायला सांगता ?’’ तेव्हा गुरुदेव केवळ हसले, काहीच बोलले नाहीत. नंतर अभ्यासवर्गात ‘हे सर्व आमचा ‘अहं’ न्यून करण्यासाठी होते’, असे आमच्या लक्षात आले.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांचा ‘सर्वकाही श्री गुरूंचेच आहे’, असा भाव असणे, त्यामुळे साधकांवरही गुरुभक्तीचा संस्कार होणे : गुरुदेवांनी आम्हाला अभ्यासवर्गात सांगितले होते, ‘सर्वकाही श्री गुरूंचेच (गुरुदेवांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे) आहे.’ तसा त्या उभयतांचा भावही आम्ही अनुभवला. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईत आल्यावर त्यांचे वास्तव्य गुरुदेवांच्या निवासस्थानी असतांना एखादा दूरभाष करायचा असेल, तरी गुरुदेव प.पू. बाबांना विचारूनच करायचे. गुरुदेवांना स्वतःची गाडी (लाल मारुति) कुठे कामासाठी पाठवायची असेल, तरी ते प.पू. बाबांना विचारूनच पाठवायचे. डॉ. (सौ.) कुंदाताईही ‘अल्पाहार कुठला करायचा ?’, ‘जेवणात कुठले पदार्थ हवेत ?’, हे प.पू. बाबांना विचारूनच करत असत. ‘सर्व काही गुरूंचेच आहे’, या भावाने त्या दोघांचे वागणे असल्यामुळे आम्हा साधकांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला गुरुदेवांचे निवासस्थान तीर्थस्थानच वाटत असे.
४ इ. साधकांना वेळोवेळी चुका सांगून शिकवणे : गुरुदेव म्हणजे, चालते बोलते विद्यापीठच होते; पण आम्हाला घडवायला त्यांना कष्ट घ्यावे लागले.
४ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘सांगकाम्याप्रमाणे सेवा होत आहे’, याची जाणीव करून देणे : मी आणि श्री. प्रकाश शिंदे तसे सांगकामेच होतो. गुरुदेव सांगतील, तेवढीच सेवा आम्ही करत असू. ‘इतरही सेवा करायला हव्या’, हे गुरुमाऊलीला आमच्या लक्षात आणून द्यावे लागले. एका अभ्यासवर्गात ते आम्हाला म्हणाले, ‘‘सगळ्यांना आनंद मिळतो ना ?; पण अभ्यासवर्ग चालू करायच्या आधी १ घंटा २ – ३ साधकांना पुष्कळ सेवा करावी लागते आणि अभ्यासवर्ग संपल्यानंतर आवरायलाही अर्धा ते एक घंटा वेळ द्यावा लागतो.’’ त्यांनी असे सांगितल्यावर आम्हाला आमची चूक कळली. त्यानंतर आम्ही अभ्यासवर्गाच्या आधी अर्धा घंटा येऊन केर काढणे, पटल-आसंद्या पुसणे, फलक लावणे, अध्यात्मावरील तक्ते लावणे इत्यादी सेवा करू लागलो.
४ इ २. सुखासनावरील उशा अयोग्य प्रकारे ठेवल्याची चूक सांगून प्रत्येक कृती परिपूर्ण करण्यास शिकवणे : एकदा गुरुदेवांच्या निवासस्थानी प.पू. भक्तराज महाराज येणार होते; म्हणून आम्ही सिद्धता करत होतो. सुखासनावर (सोफ्यावर) बसल्यावर ‘पाठीला आरामदायी वाटावे’, यासाठी मी पाठीशी छोट्या उशा ठेवल्या. तेव्हा ‘त्या उशांवर असलेली फुलझाडांची चित्रे उलटी दिसत आहेत’, हे माझ्या लक्षातही आले नव्हते. ही चूक गुरुदेवांनी माझ्या लक्षात आणून दिली.
४ इ ३. आईस्क्रीम शीतकपाटाच्या खालच्या भागात ठेवल्याने ते वितळणे आणि ही चूक गुरुदेवांनी अभ्यासवर्गात सांगणे : गुरुदेवांनी एकदा मला शीतकपाटात आईस्क्रीम ठेवायला सांगितले. मी ते शीतकपाटाच्या खालच्या भागात ठेवल्यामुळे ते वितळले. गुरुदेवांनी ही चूक मला अभ्यासवर्गात सांगितली.
४ इ ४. साधकांच्या लक्षात न आलेल्या अनेक चुका दाखवून देणे
अ. चिकित्सालयामध्ये किंवा प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई (गुरुदेवांचे पिता-माता) यांच्या किंवा गुरुदेवांच्या निवासस्थानी कुठेही जळमट असो, अस्वच्छता असो, हस्तप्रक्षालन पात्र (बेसिन) अस्वच्छ असो, गुरुदेव ते स्वतः स्वच्छ करत. आमच्या ते लक्षातच आलेले नसायचे.
आ. गुरुदेव आणि डॉ. (सौ.) कुंदाताई अभ्यासवर्ग घेण्यासाठी गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे जात, तेव्हा आम्ही मुलेच सेवाकेंद्रात असायचो. तेव्हाही आमच्याकडून पुष्कळ चुका होत असत, ‘सेवाकेंद्रातील खिडक्यांच्या तावदानांना ‘हूक’ न लावल्यामुळे त्या वार्यामुळे आपटत असत. शीतकपाटातील मिठाई, फळे आणि अन्य पदार्थ खराब होऊन जात असत.’
४ इ ५. चुका सांगून योग्य दृष्टीकोन दिल्यामुळे साधकाची अंतर्बाह्य शुद्धी होणे : गुरुदेव परत आल्यावर आम्हाला या चुका दाखवून द्यायचे. तेव्हा मला वाटायचे, ‘मी प्रपंचही नीट करू शकत नाही, तर परमार्थ कसा करणार ?’ माझ्याकडून सेवा करतांना अशा अनेक चुका व्हायच्या. तेव्हा वेळोवेळी गुरुदेव आणि सहसाधक यांनी मला माझ्या चुका सांगून त्यावर योग्य दृष्टीकोनही दिले. त्यामुळे ‘मी अंतर्बाह्य शुद्ध होत आहे’, असा माझा भाव होता. आम्ही मनोमन त्यांच्या चरणी क्षमायाचना करत असू; कारण शेवटी तेच आमचा आधार होते.
(क्रमशः)
– श्री. विष्णु कदम (वय ६४ वर्षे), आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१५.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |