वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद

सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष

वाराणसी (उत्तरप्रदेश) – तणाव ही एक सार्वत्रिक समस्या बनली आहे. त्यामुळे  समाजातील प्रत्येक वयोगट त्रस्त आहे. विविध कारणांमुळे ताणतणाव वाढत असल्याने शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक आजार होत आहेत. एका अभ्यासानुसार भारतातील अनुमाने ७४ टक्के लोक तणावग्रस्त आहेत. त्यामुळे तणाव नियंत्रणासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे. नामस्मरण केल्याने तणावावर नियंत्रण मिळवणे शक्य होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. सानिका सिंह यांनी केले. तेजगंज येथील आर्य समाज इंटर कॉलेजमध्ये ‘तणावमुक्ती नियंत्रण’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

नामस्मरणाने तणावावर नियंत्रण

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे झाली. त्यानिमित्त ‘भारत विकास परिषदे’ने या प्रवचनाचे आयोजन केले होते. याच विषयावर पुआरी कला, कचार आणि आशापूर येथील ‘आर्.एस्. कॉन्व्हेंट सैनिक स्कूल’ येथे प्रवचन घेतले. या सर्व प्रवचनांना शिक्षक-शिक्षिका यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तणावामागील कारणे आणि त्यावर सांगितलेले उपाय ऐकून सर्वजण प्रभावित झाले.

क्षणचित्रे

१. भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सूर्या हॉटेलच्या मालक मीना सिंह उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी काही वेळासाठी कार्यक्रमाला आले होते; पण विषय ऐकल्यानंतर मला शेवटपर्यंत जावेसे वाटले नाही.’’

२. ‘संत अतुलानंद विद्यालय’ आणि ‘आर्.एस्. कॉन्व्हेंट सैनिक स्कूल’च्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही वरील विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली.