जम्मू – येथील जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर अखनूरच्या तुंगी मोर भागात प्रवाशांनी भरलेली बस खोल खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर ४० प्रवासी घायाळ झाले. या बसमध्ये ७५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
येथील तीव्र वळणावर समोरून बस आल्याने अपघाती बसच्या चालकाचा अंदाज चुकला आणि हा अपघात झाला. बस खड्ड्यात पडताच आरडाओरडा झाला. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोचले. पोलिसांनाही कळवण्यात आले. तातडीने बचाव कार्य चालू करण्यात आले. बसच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढण्यात आले.
उत्तरप्रदेशातील ही बस जम्मूहून शिवखोडी धामकडे जात होती. कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरापासून ८० किलोमीटर अंतरावर रियासी जिल्ह्यातील पौनी येथे शिवखोडी धाम आहे.