नागपूर येथील ‘आर्.टी.ई.’ घोटाळ्यात २ पालकांना अटक !

आरोपी शाहिद शरीफ याने उघडले होते ‘आर्.टी.ई.’चे समांतर खासगी कार्यालय !

प्रतिकात्मक छायाचित्र

(‘आर्.टी.ई.’ म्हणजे बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार)

नागपूर – आर्.टी.ई अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणार्‍या २ पालकांना सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजेश बुआडे (वय ३५ वर्षे) यांना सदर पोलिसांनी, तर श्यामशंकर पांडेय यांना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात प्रथमच पालकांना अटक झाली आहे.

आर्.टी.ई. घोटाळ्याचे अन्वेषण करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने २ दिवसांपासून धाडसत्र चालू केले होते. पथकाने या प्रकरणातील मुख्य शाहिद शरीफ याने उघडलेल्या समांतर खासगी आर्.टी.ई. कार्यालयावर धाड घातली होती. या प्रकरणात गुन्हे नोंद असलेल्या १७ पालकांपैकी श्यामशंकर पांडे आणि राजेश बुआडे या २ पालकांना अटक करण्यात आली. श्यामशंकर हा एका मोठ्या आस्थापनात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.