सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !


उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात; परंतु आधुनिक विज्ञानवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच खरी वाटते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आध्यात्मिक संशोधन करत असतांना ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्माे स्कॅनर)’, ‘थर्मल इमेजिंग’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरून प्रयोग करवून घेत आहेत. हे ते करत असलेल्या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी केलेल्या विविधांगी आणि अफाट आध्यात्मिक संशोधनापैकी काही सूत्रांची ओळख येथे करून घेऊया.

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोलकाच्या संदर्भातील संशोधन

परात्पर गुरु डॉक्टरांनी लाकूड, विविध धातू, दगड, स्फटीक, रुद्राक्ष आदी विविध घटकांपासून बनवलेले लोलक आणि लोलकाचा दोर म्हणून विविध धातूंच्या साखळ्या, रेशीम, लोकर, सूत अन् केळीच्या झाडाचे सोप यांचा वापर करून अनेक प्रयोग केले. त्यांतून ‘केळीच्या झाडाच्या सोपाच्या धाग्याला रुद्राक्ष बांधून बनवलेला लोलक सर्वाधिक सात्त्विक असतो आणि त्यातून अचूक उत्तरे मिळतात’, हे त्यांनी शोधून काढले.

वाईट शक्तींच्या संदर्भातील संशोधन

वाईट शक्तींचे प्रकार, त्यांचे कार्य, मानवी जीवन आणि वातावरण यांवर होणारे त्यांचे परिणाम, त्यांनी मानवाला त्रास देण्यामागील कारणे अन् त्या त्रासांची लक्षणे आदी विषयांवर परात्पर गुरु डॉक्टर वर्ष २००० पासून संशोधन करत आहेत. या संशोधनाद्वारे त्यांनी वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या आणि साधकांनाही त्या शिकवल्या.

विकार-निर्मूलनासाठी उपयुक्त असलेल्या उपायपद्धतींचा शोध

बिंदूदाबन

अ. स्पर्शविरहित बिंदूदाबन (ॲक्युप्रेशर) : शारीरिक आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी शरिरावर दाब देऊन बिंदूदाबन करण्याची पद्धत प्रचलित आहे. वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त ठरणारी ‘स्पर्शविरहित बिंदूदाबन (ॲक्युप्रेशर)’ ही पद्धत शोधून काढली. (याविषयीचे विवेचन ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’ या ग्रंथात केले आहे.)

आ. नामजप-उपाय : विविध प्रकारचे नामजप केल्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्यास साहाय्य होते, यासंदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रयोग करून पुढील गोष्टींचा शोध लावला.

आ १. नामजपाची प्रयोगपद्धत : उच्च देवतांच्या नामजपांचे प्रयोग करून त्यांतून स्वतःचे त्रास दूर होण्यासाठीचा आवश्यक तो नामजप शोधणे

आ २. उपायांसाठी उपयुक्त ठरणारे नामजप : ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुणवाचक शब्दांचे जप; ० ते ९ या अंकांचे जप अन् पंचमहाभूतांचे जप (उदा. श्री वायुदेवताय नमः।)

आ ३. नामजपाची परिणामकारकता वाढवणार्‍या पद्धती : नामजपाच्या आरंभी आणि / किंवा शेवटी १ किंवा २ ‘ॐ’ लावणे, ‘एक-आड-एक नामजप’ करणे (‘आधी पहिल्या नामाचा, नंतर दुसर्‍या नामाचा, नंतर पुन्हा पहिल्या नामाचा, त्यानंतर पुन्हा दुसर्‍या नामाचा’ अशा पद्धतीने नामजप करणे)

(याविषयी सविस्तर विवेचन ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप (३ खंड)’ या सनातनच्या ग्रंथात केले आहे.)


रिकाम्या खोक्यांचे उपाय

रिकाम्या खोक्यांचे उपाय करतांना साधक

रिकाम्या खोक्यात पोकळी असते अन् पोकळीत आकाशतत्त्व असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी खोक्यातील आकाशतत्त्वामुळे होणार्‍या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि साधकांकडूनही प्रयोग करवून घेतले. या संशोधनाच्या आधारे त्यांनी ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ही उपायपद्धत शोधली. (याविषयी सविस्तर विवेचन ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ खंड)’ यात केले आहे. ही उपायपद्धत कशी उपयोगात आणावी, याविषयीची माहिती http://sanatan.org या संकेतस्थळांवरही दिली आहे.)

 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन सादर केलेले शोधनिबंध

बँकॉक, थायलंड येथे झालेल्या १० व्या आंतर्राष्ट्रीय परिषदेत बोलतांना सौ. श्वेता क्लार्क

‘भारतात देहली, मुंबई, पुणे आदी ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, तसेच विदेशातीलही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सहभाग घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मातील संशोधनावर आधारित त्यांनी लिहिलेले शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधांचे विषय अध्यात्म, सात्त्विक संस्कृत भाषा, जप, मंत्रजप, भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, मूर्तीकला इत्यादी होते. या शोधनिबंधांच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून वेध घेतला गेला आणि त्यांची सत्यता पडताळली गेली. या विषयांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म सांगण्याचे अमूल्य कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केले. यापुढेही त्यांचे ते कार्य अविरत चालूच आहे. ‘अध्यात्मशास्त्र समजून घेऊन, म्हणजे जीवनातील साधनेचे महत्त्व, सात्त्विकता आणि असात्त्विकता यांतील भेद इत्यादी समजून घेऊन जगातील लोक सात्त्विक व्हावेत’, हा त्यांचा उद्देश आहे. थोडक्यात ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करणे’, हे त्यांचे व्यापक ध्येय आहे. ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ८ राष्ट्रीय परिषदांमध्ये आणि १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्याबरोबरच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मातील इतरही विषयांवर अविरत संशोधन कार्य चालू आहे. या कालावधीत वैज्ञानिक उपकरणांद्वारे एकूण १ सहस्र ७२ संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या असून १८० अहवाल सिद्ध (तयार) करण्यात आले आहेत.  यामुळे हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि अध्यात्माचे महत्त्व विज्ञानाच्या आधारेही सिद्ध करून ते जगासमोर मांडता आले आहे.


आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचा शोध

अ. देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे उपाय : देवतेच्या सात्त्विक नामजप-पट्टीमधून त्या देवतेची शक्ती प्रक्षेपित होत असते. या शक्तीमुळे आध्यात्मिक उपाय होतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप-पट्ट्यांच्या उपयोगाच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग केले आणि नामजप-पट्ट्यांच्या साहाय्याने आध्यात्मिक त्रास दूर करण्याच्या पुढील पद्धती शोधून काढल्या.

१. वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या चारही बाजूंना नामजप-पट्ट्यांचे मंडल घालणे.

२. वास्तूशुद्धीसाठी वास्तूमध्ये नामजप-पट्ट्यांचे छत

३. वाहनशुद्धीसाठी दुचाकी वाहनास पुढे आणि मागे नामजप-पट्ट्या लावणे, तर चारचाकी वाहनात नामजप-पट्ट्या चारही बाजूंना आणि छताला लावून कवच सिद्ध करणे

(सनातनच्या स्थानिक वितरकांकडे वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी यांसाठी आवश्यक असणारा नामजप-पट्ट्यांचा संच आणि त्या पट्ट्या लावण्याच्या पद्धतीसंबंधीचे पत्रक उपलब्ध असते.)

आ. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजपपट्ट्या लावणे : ब्रह्मांडातील प्राणशक्ती मनुष्याच्या देहात कुंडलिनीचक्रांच्या माध्यमातून प्रवाहित होत असते. व्यक्तीच्या एखाद्या कुंडलिनीचक्रातून शरिरात प्रवाहित होणार्‍या प्राण-शक्तीच्या वहनामध्ये अडथळा निर्माण झाल्यास त्या कुंडलिनीचक्राशी संबंधित अवयवांमध्ये विकार निर्माण होतो; म्हणून त्या कुंडलिनीचक्राच्या स्थानी उपाय केल्यास व्यक्तीला होणारा त्रास लवकर घटण्यास साहाय्य होते. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजपपट्ट्या लावण्याने त्यांचे रक्षण होते, तसेच उपायही होतात, याचा शोध परात्पर गुरु डॉक्टरांनी लावला.

इ. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घालणे

ई. संतांनी बराच काळ निवास केलेल्या वास्तूत किंवा खोलीत बसून नामजपादी उपाय करणे

उ. संतांनी वापरलेल्या वस्तूंचा आध्यात्मिक उपायांसाठी वापर करणे

ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील कपाटाचे छायाचित्र याचा उपायांसाठी वापर करणे .

(सर्व लिखाणासाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय कार्य : खंड १’)


पंचतत्त्वांनुसार उपाय


मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपासून (महाभूतांपासून) बनलेले आहे. त्या त्या तत्त्वाच्या (महाभूताच्या) स्तरावर उपाय केल्यास त्या त्या तत्त्वाशी संबंधित त्रास दूर होण्यास साहाय्य होते. पंचतत्त्वांच्या स्तरावर उपाय करण्याविषयीचे विविध प्रयोग परात्पर गुरु डॉक्टरांनी पुढीलप्रमाणे केले.


१. पृथ्वीतत्त्वाचे उपाय :
कपाळाला सात्त्विक कुंकू लावणे, सात्त्विक अत्तराचा सुगंध घेणे इत्यादी
२. आपतत्त्वाचे उपाय :
तीर्थ प्राशन करणे, खडे-मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे दोन्ही पाय बुडवून ठेवणे इत्यादी
३. तेजतत्त्वाचे उपाय :
विभूती लावणे, तुपाच्या दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ एकटक पहाणे इत्यादी
४. वायुतत्त्वाचे उपाय :
विभूती फुंकरणे इत्यादी
५. आकाशतत्त्वाचे उपाय
अ. निरभ्र आकाशाकडे पहाणे, निरभ्र आकाशाखाली नामजपादी उपाय करणे
आ. संत भक्तराज महाराज यांच्या आवाजातील भजने ऐकणे
इ. रिकाम्या खोक्यांचे उपाय करणे

 

प्राणशक्तीवहन उपाय

 

प्राणशक्तीवहन उपाय करतांना साधिका

मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्तीवहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित शरीरसंस्थेची (किंवा इंद्रियाची) कार्यक्षमता अल्प होऊन विकार निर्माण होतात. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा कसा शोधावा ? तो दूर करण्यासाठी कोणता नामजप, मुद्रा आणि न्यास करावा ? इत्यादींविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःवर विविध प्रयोग केले आणि उपायपद्धतीच्या परिणामांचा अनुभव घेतला. या संशोधनाचा परिपाक म्हणून ‘प्राणशक्तीवहन उपाय’ ही पद्धत अस्तित्वात आली. ही उपायपद्धत अवलंबून आज सनातनचे अनेक साधक स्वतःच स्वतःवर उपाय करण्यात सक्षम झाले आहेत. रुग्ण दूर म्हणजे अगदी दुसर्‍या देशातही असला, तरी आध्यात्मिक पातळी चांगली असलेला साधक किंवा ‘दुसर्‍याचे त्रास दूर करण्यासाठी साहाय्य करावे’, हा समष्टी भाव असलेला साधक त्या रुग्णासाठी उपाय शोधू शकतो, म्हणजेच त्याला नामजप, मुद्रा आणि न्यास सांगू शकतो. अशा साधकाने स्वतःच्या शरिरावर उपाय केल्यास त्या रुग्णावरही उपाय होऊ शकतात. यासंदर्भातही परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः अनेक प्रयोग केले आणि या पद्धतीची यशस्वीता लक्षात आल्यावर साधकांनाही ही पद्धत शिकवली. रुग्ण मंत्रोपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय, आयुर्वेदीय औषधोपचार अशा कोणत्याही उपचारपद्धतीनुसार उपचार करत असला, तरी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार शोधलेल्या उपायांचा त्याला लाभ होतो.

(याविषयीचे सविस्तर विवेचन ‘प्राणशक्तीवहन उपाय (२ खंड)’ या सनातनच्या ग्रंथात केले आहे.)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.