सौभाग्याचे कुंकू का नको ?

भारतीय स्त्रिया लग्नानंतर स्वतःच्या नावाच्या आधी ‘सौ.’ असे लिहितात. त्याचा अर्थ ‘सौभाग्यवती’ असा आहे. या सौभाग्याचे प्रतीक म्हणून त्या स्वतःच्या कपाळावर कुंकू लावतात. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला गेला आहे. बहुतांश बायका सध्या कुंकवाऐवजी टिकली लावतात. शेवटी टिकली ती टिकलीच. ‘टिकली तर टिकली’. त्यात कुंकवाप्रमाणे चैतन्य नसल्याने ती निस्तेज दिसते. सध्या या टिकल्यांचा आकारही लहान लहान होत चालला आहे. आता मोहरीच्या आकाराएवढ्या लहान टिकल्या मिळतात. त्यामुळे कपाळावर टिकली लावली आहे कि नाही ? तेच कळत नाही. काही तर चंदेरी, सोनेरी रंगाचा ठिपका लावतात, तोही कपाळावर दिसत नाहीत. कुंकू लावण्यामागचे कारण आणि अध्यात्मशास्त्र ठाऊक नसल्यामुळे भारतीय स्त्री कुंकवावरून टिकलीवर आली अन् आता तीही गायब झाली आहे. ‘बाई ग, तू कुंकू लावतेस कि नाही ? बाईने कपाळ रिकामे ठेवू नये !’, असे घरातील मोठ्या बायकांकडून ऐकायला लागू नये; म्हणून ती मोहरीएवढी का होईना ती न टिकणारी टिकली कपाळाला चिकटवायचा सोपस्कार केला जातो, असेच वाटते. एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लावून ये, मग तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो !’, असे सांगितले म्हणून पू. भिडेगुरुजींवर बोट ठेवले गेले; पण कुंकू लावले, तर स्त्रियांना काय अनन्यसाधारण लाभ होतो, हे धर्माचरण करणारी व्यक्ती अनुभवू शकते.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेत्री नयना आपटे यांनी काही दिवसांपूर्वी ‘कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घ्यायला हवे’, असे सांगितले. ‘स्वतःच्या कपाळावर कुंकू लावतांना ते अनामिकेने लावावे. तसे केल्याने दोन भुवयांच्या मध्ये असणार्‍या बिंदूवर दाब पडतो. मेंदूच्या मध्यभागेची नस तिथे जोडलेली असते. प्रतिदिन त्या भागावर दाब दिला, तर संवेदना होऊन मेंदू सतर्क होतो’, असे यामागील विज्ञान त्यांनी सांगितले. ‘हे समजून घेतले जात नाही. आधुनिकतेच्या नावाखाली सध्या कुंकू लावले जात नाही’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यात्मशास्त्रानुसार आज्ञाचक्रावर कुंकू लावल्याने स्त्रीमधील देवीतत्त्व जागृत होते, तसेच आज्ञाचक्राचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो अन् तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते. कुंकू हे शक्तीस्वरूप असते. प्रत्येक वेळी पाश्चात्त्यांनी भारतीय संस्कृतीचा पुरस्कार केल्यावरच ती अंगीकारायची का ? पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून जनरुढीत वहात जाण्यापेक्षा सौभाग्यालंकार लेऊन शक्तीतत्त्व अनुभवणे भारतीय स्त्रियांनी का सोडावे ?

– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.