तेहरान (इराण) – अझरबैझान येथील सीमेजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या इराणचे राष्ट्रपती रईसी यांच्या मृत्यूच्या मागे घातपात आहे का ?, याविषयी संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमी काही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत. या संदर्भात अद्याप इराणने कोणतेही विधान केलेले नाही. अमेरिका आणि इस्रायल या इराणच्या शत्रू राष्ट्रांनीही अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
१. रईसी यांच्या हेलिकॉप्टरने अझरबैझानमधील आफ्रीन हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या ठिकाणावरून उड्डाण घेतल्यानंतर ते इराण सीमेवरील जोल्फा भागाजवळ पोचले. विशेष म्हणजे अझरबैझानच्या सीमेवर इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ची अनेक गुप्त ठिकाणे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोसादने हेलिकॉप्टरवर इलेक्ट्रॉनिक आक्रमण केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
२. हेलिकॉप्टरच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन यंत्रणेवर हे आक्रमण झाले असावे, असा अंदाज आहे. मोसादने इलेक्ट्रॉनिक आक्रमण करतांना हेलिकॉप्टरचा उपग्रहाशी असलेला संपर्क (सॅटेलाइट कनेक्शन) तोडला असावा. या आक्रमणामुळे हेलिकॉप्टरची संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली असावी आणि यानंतर हेलिकॉप्टर नियोजित मार्गापासून दूर गेले असावे. हेलिकॉप्टरमधील संगणक प्रणाली ठप्प झाल्याने वैमानिकाला हेलिकॉप्टर किती उंच उडत आहे ?, याचा अंदाज आला नसावा आणि ते टेकडीवर आदळल्यामुळे अपघात झाला असावा, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. या अपघातामागे खराब हवामान असल्याचेही सांगितले जात आहे.
३. हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले, त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचे लहान लहान तुकडे दिसून आले. त्यामुळे हेलिकॉप्टरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. अपघातापूर्वी वैमानिकाने कोणताही आपत्कालीन संदेश दिला नाही. त्यामुळेच हेलिकॉप्टरचा अचानक स्फोट झाला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
४. हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी हवामानाची माहिती गोळा केली जाते, त्यामुळे खराब हवामानाची माहिती रईसी यांच्या हेलिकॉप्टर कर्मचार्यांना वेळेत देण्यात आली नव्हती का ? अशी शंकाही उपस्थित होत आहे.
५. हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी संपर्क यंत्रणा बंद केली होती, असे म्हटले जात आहे. वैमानिकाने असे का केले ?, हा प्रश्न आहे.
६. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी त्यातील एक व्यक्ती बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे. हेलिकॉप्टर मार्गांची माहिती उघड झाली होती का ?, उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तपासणी झाली नव्हती का ?, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे रईसी यांचे हेलिकॉप्टर ४० वर्षांपेक्षा जुने होते.