परराष्ट्रमंत्र्यांह एकूण ९ जणांचा मृत्यू
तेहरान (इराण) – इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा १९ मे या दिवशी अझरबैझान देशाच्या सीमेवरील जोल्फा शहराजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्र्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रईसी यांच्या ताफ्यात ३ हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यांपैकी २ सुरक्षितपणे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणावर पोचले; परंतु एकाचा अपघात झाला. रईसी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानच्या सीमेजवळील शहरामध्ये गेले होते.
१९ मे सायंकाळी हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. यासाठी ड्रोनचे साहाय्य घेण्यात आले. त्यात जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे आढळून आले. त्यानंतर साहाय्यता कार्य करण्यात आले. तज्ञांचे म्हणणे आहे की, रईसी यांचे हेलीकॉप्टर अचानक धुक्यात सापडल्यामुळे हा अपघात झाला.
इराणचे उपराष्ट्रपती महंमद मोखबर यांच्याकडे अंतरिम राष्ट्रपतीपद
रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इराणचे उपराष्ट्रपती महंमद मोखबर (वय ६८ वर्षे) यांच्याकडे आता अंतरिम राष्ट्रपतीपद सोपवण्यात येणार आहे. अंतरिम राष्ट्रपती म्हणून मोखबर आता ३ सदस्यीय समितीचा भाग असतील. संसदेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची ही समिती पुढील ५० दिवसांच्या आत नव्या राष्ट्रपतीसाठीच्या निवडणुकीची घोषणा करेल.
घातपाताचा संशय !हेलिकॉप्टरच्या अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या इराणच्या शत्रूत्वावरून या दोन देशांनी रईसी यांचा काटा काढल्याचे म्हटले जात आहे; मात्र हा अपघात घातपात होता, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायलनेही त्याची गुप्तचर संस्था ‘मोसाद’चा यामागे हात असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. |
महसा अमिनी हिच्या शहरात फटाके फुटले !
राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर सर्वांत मोठा आनंद इराणच्या कुर्दिस्तान भागात साजरा करण्यात आला. येथे साकेज शहरात लोकांनी फटाके फोडून रईसी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा केला. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात निदर्शनांचा चेहरा बनलेल्या महसा अमिनी हिचे साकेज हे मूळ गाव आहे. महसा अमिनीने इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शनांमध्ये भाग घेतला. हिजाब न घालता बाहेर पडल्यासाठी तिला पोलिसांनी अटक केली आणि तिला बेदम मारहाण केली. रुग्णालयात उपचारांच्या वेळी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर ती इराणमध्ये ‘महिलांच्या हक्कांसाठी लढणारी’, अशी तिची ओळखली गेली. तिच्या समर्थनार्थ देशभरातील महिला रस्त्यावर उतरल्या. काही काळातच तिचे नाव जगभर गाजले. रईसी यांच्या विरोधात साकेज शहरातील लोकांमध्ये प्रचंड संताप होता, जो त्यांच्या मृत्यूनंतरही समोर आला आहे.