‘अब्रू (मानसन्मान) ही समाजातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली जाते. मानहानीचा दावा प्रविष्ट (दाखल) केल्याच्या आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. प्रत्येक माणसाने पैसा, यश कमवता कमवता स्वतःचे नावही कमावलेले असते. कायद्याच्या भाषेत यास ‘प्रतिष्ठा मिळवण्याचा अधिकार’ (Right to have reputation) असे म्हणतात. प्रतिष्ठा म्हणजे चांगले नाव असण्याचा अधिकार. आता यातही गंमत अशी आहे की, चांगले नाव म्हणजे नेमके काय ? एखादा व्यक्ती मटका (जुगार) चालवून स्वतःचा चरितार्थ चालवतो. मटका वाईट आहे; परंतु चरितार्थ तर चांगला आहे. भरीस भर म्हणजे तो त्या पैशावर छोटा दानधर्म करतो, देवधर्माचे काय करतो, मग या व्यक्तीचे चरित्र काय ? किंवा याची प्रतिष्ठा चांगली कि वाईट ? हा प्रश्न आजपर्यंत अनेक न्यायालयांना पडलेला आहे.
अपकीर्ती (Defamation) वा मानहानी या प्रकारामध्ये सरळसरळ २ प्रकार येतात.
अ. अपकीर्ती करणे (Libel Defamation)
आ. निंदा किंवा कलंकित करणे (Slander Defamation)
१. अपकीर्तीचा किंवा मानहानीचा दावा म्हणजे काय ? आणि त्यात कोणते घटक येतात ?
अपकीर्तीच्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीविरुद्ध लेखी स्वरूपात काही मानहानीकारक खोटे आणि निंदनीय लिहिले असल्यास ही गोष्ट अपकीर्तीमध्ये येते. एखाद्या पत्रकाराने कोणताही न अभ्यास करता, राग डोक्यात ठेवून, कोणत्याही सामाजिक भान न ठेवता, आकसाने दुसर्या व्यक्तीविरुद्ध अपकीर्तीकारक लिखाण प्रसिद्ध केले किंवा चित्र काढले, तर हा कायद्याच्या दृष्टीने मानहानीचा दावा ठरू शकतो. यात ४ गोष्टी अतिशय आवश्यक मानल्या जातात.
अ. एक तर जे वृत्त छापलेले आहे ते धादांत खोटे असणे जरूरीचे आहे.
आ. हे वृत्तांत लेखी स्वरूपात असायला हवे.
इ. जे काही छापले गेलेले आहे, त्यात नेमकी अपकीर्तीच होत आहे.
ई. ती बातमी (वार्ता) छापली गेलेली आहे.
असे चारही प्रकार घडले, तर ती ‘अपकीर्ती’ स्वरूपातमोडली जाते.
२. निंदा किंवा कलंकित करणे याविषयीचा दावा म्हणजे काय ?
दुसर्या प्रकारची अपकीर्ती, म्हणजे निंदा किंवा कलंकित करणे (Slander Defamation) यांचा अंतर्भाव असतो. ही तोंडी स्वरूपाची असते. यात लिहावे लागत नाही. जर एखादा व्यक्ती दुसर्याविषयी तिसरीकडे मानहानीकारक विधाने करत असेल आणि ते सिद्ध होत असेल किंवा विधानामध्ये अपकीर्ती होत आहे, असे लक्षात येत असेल, तर अशी अपकीर्ती निंदा प्रकारात मोडते. या दोन्ही स्वरूपामध्ये अपकीर्ती करणे (Libel Defamation) हा अधिक गंभीर गुन्हा ठरतो, तर निंदा किंवा कलंकित करणे (Slander Defamation) हा अल्प गंभीर गुन्हा समजला जातो.
३. मानहानीच्या खटल्यातील एक महत्त्वाचा पैलू
भारतीय दंड संहिता कलम ४९९ प्रमाणे ‘अपकीर्ती करणे’, हा फौजदारी गुन्हा समजला जातो. ‘ज्याप्रमाणे छायाचित्रे कायमस्वरूपी आहेत’, या सिद्धांताप्रमाणे अपकीर्ती वा मानहानी केली जाणे, हे अधिक गंभीरतेने घेतली जाते. यात एखाद्या वाक्याने जर मानहानी सिद्ध होत असेल, तर ‘ती होत नाही’, हे सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व ज्याने ते वाक्य लिहिलेले आहे, त्याच्यावर असते. ज्या व्यक्तीची अपकीर्ती होत आहे, त्याने केवळ खटला प्रविष्ट करायचा असतो आणि अपकीर्ती कशी होत नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवर असते.
४. मानहानीच्या प्रकरणातील ‘ईनेन्डो’ (सूचित करणारा) प्रकार
जेव्हा काही वाक्ये थेट मानहानीकारक असू शकतात, तेव्हा सिद्ध करणे सोपे जाते; परंतु काही वाक्ये अशी असू शकतात, जसे की, ‘लेकी बोले सुने लागे’ याप्रमाणे ‘मी निष्पापपणे हे बोललो किंवा लिहिले; पण माझा अपकीर्ती करायचा उद्देश नव्हता’, असाही प्रयत्न बचावासाठी न्यायालयात केला जातो. याला कायदेशीर भाषेत ‘ईनेन्डो’ (सूचित करणारा – Innuendo) असे म्हणतात. ‘ईनेन्डी’ प्रकारात अशी वाक्ये असतात की, ज्याचा वेगळाच अर्थ बघितला, तर तो साधा वाटू शकतो. फिर्यादीला जेव्हा एखाद्याच्या वाक्यामध्ये ‘ईनेन्डो’सारखे वाक्य वाटत असेल, तर त्याचा उल्लेख त्याच्या नोटीसमध्ये आला पाहिजे, असे सार्वत्रिक आहे. ‘ईनेन्डो’ प्रकरणावर फिर्यादीने प्रकाश पाडला पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला अशा प्रकाराविषयी खोल अन्वेषण वा शहानिशा करता येते. उदाहरणार्थ एखादा मित्र दुसर्या मित्राविषयी उपहासाने असे म्हणाला, ‘हा माझा चांगला मित्र आहे आणि त्याने माझे पैसे चोरले असे मी कधीही म्हणणार नाही. मी त्याच्या तोंडावर असे कधी बोलेन का ?’ अशा प्रकारचे वाक्य हे ‘ईनेन्डो’ प्रकारात येते. याप्रमाणे ‘मित्रानेच पैसे चोरलेले आहेत’, असा अप्रत्यक्ष आरोप होतो आणि ‘मी त्याच्या तोंडावर असे कधी बोलेन का ?’, याचा अर्थ ‘मी त्याच्या पाठीमागे याने पैसे चोरले आहेत’, असे नक्कीच सांगत असेल किंवा सांगितलेले असावे, असा अर्थ ध्वनीत होतो.
५. मानहानीच्या प्र्रकरणामध्ये असलेल्या बचावात्मक पर्यायांविषयी…
मानहानीच्या प्रकाराला काही बचावात्मक पर्याय उपलब्ध आहेत. या बचावांमुळे मानहानीचा ठपका लागत नाही. जर मानहानीकारक विधानामध्ये तथ्य असेल आणि ते खरेखुरे समाजापुढे आणणे हिताचे आहे, असे सिद्ध झाल्यास आरोपी यातून सुटू शकतो. वाजवी टिप्पण्या (Fair Comments) या प्रकाराप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि योग्य टिपणी केलेली असेल अन् ती खरी ठरत असेल, तर हा मानहानीचा बचाव ठरतो. पूर्ण विशेषाधिकार याप्रमाणे अशा प्रकारची विधाने करण्याचे अधिकार जर एखाद्या व्यक्तीला असल्यास ते मानहानीच्या प्रकरणामध्ये येत नाही. उदाहरणार्थ न्यायालयीन खटल्यातील आरोप-प्रत्यारोप, सैन्याची वा नौदलाची कार्यवाही, न्यायालयीन कामकाज आणि टिप्पणी, संसदेतील खासदारांची एखाद्या विषयावरील खुली चर्चा या गोष्टी मानहानीच्या प्रकारात मोडत नाहीत. जनहितार्थ याचिकेप्रमाणे जे बोलले वा लिहिले जाते ते सर्व मानहानीच्या बचावामध्ये असू शकते. काय चूक हे कुणाची चूक यापेक्षा केव्हाही मोठे आणि महत्त्वाचे असते. या सिद्धांताप्रमाणे कार्यवाही केली जाते.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.