‘मी साधारण ८ – १० वर्षांचा असल्यापासून आईच्या समवेत अध्यात्मप्रचाराच्या सेवेसाठी जात असे. मी महाविद्यालयात जायला लागल्यानंतर माझे सेवेला जाणे बंद झाले. महाविद्यालयात असतांना व्यावहारिक जगातील माणसांना पाहून मला वाटायचे, ‘पुष्कळ शिकून पुष्कळ पैसा मिळवायचा आणि सुखाने आयुष्य जगायचे.’ माझी काही वर्षे शिक्षण घेण्यात आणि नोकरी शोधण्यात गेली.
१. घरातील व्यक्ती साधना करणार्या असूनही साधना न करणे
घरात माझी आई आणि बहीण साधना करणारे असूनही मी साधनेकडे लक्ष देत नसे. आईकडील नातेवाईक म्हणजे दोन्ही मामा, मावशी आणि मावस बहीण हेही साधना करत होते; पण ‘अध्यात्म, म्हणजे ते सर्व जण करत असलेले व्यष्टी-समष्टी साधनेचे प्रयत्न हा भ्रम आहे’, असे मला वाटत असे. आई मला अधूनमधून सेवाकेंद्रात सेवेसाठी जायला सांगत असे; पण मला त्यात रस नव्हता. असे असले, तरी माझ्याकडून अधूनमधून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हे नामजप आपोआप चालू व्हायचे आणि आपोआप थांबायचे.
२. केवळ आईच्या सततच्या सांगण्यामुळे सेवाकेंद्रात सेवेसाठी जाणे, साधकांच्या प्रेमळ वागण्यामुळे तिथे सेवा करायला आवडणे
‘आई सांगत आहे; म्हणून तरी सेवेसाठी जाऊया’, या विचाराने मी दादर सेवाकेंद्रामध्ये सेवेसाठी गेलो. तिथे मला स्वच्छतेची सेवा दिली होती. ती सेवा करतांना माझ्या मनात विचार आला, ‘मी चांगला शिकलेला असूनही हे काय करत आहे ?’; परंतु सेवाकेंद्रातील साधकांचा आपलेपणा, प्रांजळपणा, प्रेमळ स्वभाव पाहून मला ‘तिथे जाऊया’, असे वाटले. पहिल्यांदाच जाऊनही मला ‘मी इथे वेगळा आहे किंवा नवीन आहे’, असे कधी वाटले नाही.
३. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायला मिळणे
त्यानंतर आईने मला स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला जायला सांगितले. तेव्हा ‘मला केवळ स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकायचे आहे’, या विचाराने मी त्या वर्गांना गेलो. काही मास प्रशिक्षण वर्गाला गेलो. त्यानंतर मला एका शिबिरासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये जाण्याची संधी मिळाली.
४. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे
४ अ.‘साधक त्यांच्या कोशात रहातात’, असे वाटणे; मात्र आश्रमात आल्यावर आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य जाणवून ‘स्वतःकडे कुणी तरी पहात आहे’, असे जाणवणे : ‘मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. मी बाहेर कसा वागतो ? आणि याविरुद्ध आश्रमातील साधना करणारे सर्व जण कसे वागतात ? साधक त्यांच्या कोशामध्ये रहातात, त्यांना बाहेरचे जग कळत नाही’, असे मला वाटायचे; पण आश्रमात प्रवेश केल्यानंतर मला आश्रमातील सात्त्विक स्पंदने आणि चैतन्य या गोष्टी अनुभवता येऊ लागल्या. आश्रमात आल्यानंतर काही वेळाने मला वाटले, ‘कुणाचे तरी माझ्यावर लक्ष आहे. कुणीतरी मला पहात आहे.’
४ आ. आश्रमातील देवता, देवतांची चित्रे आणि गुरुपरंपरेची छायाचित्रे पाहून आंतरिक भाव जागृत होऊन ‘रामनाथी आश्रम अद्भूत आहे’, असे वाटणे : आश्रमातील श्री सिद्धिविनायक मंदिर पाहिल्यावर मी मुंबईला असतांना श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये नेहमी जातो, त्याची आठवण झाली. श्री भवानीदेवीचे मंदिर पाहून मला माझ्या कुलदेवीची आठवण आली. स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र अन् ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पाहून माझा आंतरिक भाव जागृत झाला. ‘मी वेगळ्याच विश्वात आलो आहे’, असे मला वाटले; पण चांगले काहीतरी घडत आहे, माझ्यात काहीतरी शिरत आहे’, असे मला वाटत होते. ‘प.पू. गुरुदेवांचा हा रामनाथी आश्रम किती वेगळा, सुंदर आणि अद्भुत आहे’, असे मला वाटले.
४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील जाणवलेली सजीवता ! : माझी आई मला रामनाथी आश्रमाच्या संदर्भात नेहमी सांगत असे; पण तेव्हा मला तिचे बोलणे कळायचे नाही. मी रामनाथी आश्रमातील सात्त्विक वातावरण प्रत्यक्षात पाहिले, दैवी कण पाहिले, त्याविषयीचे संशोधन पाहिले, तेव्हा मला आईच्या बोलण्याचा अर्थ समजला. ‘सनातन प्रभात’, नियकालिकांच्या सेवेच्या ठिकाणी ठेवलेले प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिले. ‘मी जाईन, त्या दिशेने त्यांचे केवळ डोळेच नाही, तर पूर्ण देहच माझ्या दिशेने वळतो’, हे पाहून मला तो चमत्कारच वाटला. ही माझ्यासाठी अत्यंत आश्चर्यची गोष्ट होती.
५. शिबिरामधील सूत्रे
५ अ. स्वतःला ठाऊक नसलेले अध्यात्मातील अनेक विषय शिबिरात समजणे : शिबिरामध्ये आम्हाला कर्मफलसिद्धांत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, ईश्वरप्राप्ती अशा अनेक विषयांवर अमूल्य मार्गदर्शन मिळाले. आजवर असे विषय मी कधी ऐकले किंवा अभ्यासले नव्हते. हे सर्व मी प्रथमच ऐकले. हे सर्व विषय ऐकून माझ्या मनात साधनेविषेयी जिज्ञासा जागृत झाली आणि ‘शिबिरासाठी येता आले’, यासाठी मला आत्यंतिक कृतज्ञता वाटली.
५ आ. शिबिरात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती : आम्हाला शिबिराच्या शेवटी लावलेले भावगीत डोळे बंद करून ऐकायला सांगितले होते. ते ऐकतांना माझा भाव पुष्कळ जागृत झाला. ‘प.पू. गुरुदेव माझ्या पाठीशी उभे आहेत’, असे जाणवून माझे पूर्ण शरीर रोमांचित झाले. मी अशी स्थिती प्रथमच अनुभवली. हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. त्या क्षणापासून माझ्या मनात आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा आणि ओढ निर्माण झाली.’
– श्री. वेदांत धडके, वांद्रे, मुंबई. (१६.४.२०२४)
श्री. वेदांत धडके यांच्या बहिणीला आश्रमात आल्यावर ‘मी स्वर्गात आले आहे’, अशी आलेली अनुभूती !
‘माझ्या मावस बहिणीला ती आश्रमात आल्यावर ‘मी स्वर्गात आले आहे’, असे वाटले होते. मी तिला विचारले होते, ‘‘तू, सर्व सोडून साधना का करत आहेस ? तुला बाकी काही मिळवायचे नाही का ?’’ तेव्हा ती म्हणाली होती, ‘‘ईश्वरप्राप्ती झाल्यावर सर्व काही प्राप्त होते.’’ तिच्या या बोलण्याचा अर्थ मला मी आश्रमात आल्यावर कळला.’- श्री. वेदांत धडके, वांद्रे, मुंबई. (१६.४.२०२४)
|