संपादकीय : ‘आप’चा जनतेला ताप !

नवी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या घटनेनंतर ते त्वरितच चर्चेत आले. नवी देहली राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आम आदमी पक्षाच्या (‘आप’च्या) सध्या खासदार असलेल्या स्वाती मालीवाल यांचा विनयभंग अन् त्यांना मारहाण होण्याची घटना केजरीवाल यांच्या निवासस्थानी घडली. केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना या प्रकरणी २ दिवसांपूर्वीच अटक झाली असून स्वाती मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. स्वाती यांच्या प्रथमदर्शी माहिती अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी आहेत. त्यात ‘त्यांनी घातलेल्या शर्टची सर्व बटणे विभव कुमार यांनी तोडली, त्यांच्या कमरेखाली मारहाण केली, छातीवर मारले, त्यांची मासिक पाळी चालू असतांना त्यांच्या ओटीपोटीत मारले’, असे नमूद केले आहे. मुख्य म्हणजे ‘तू आमचे काहीच वाकडे करू शकत नाही, तुला गाडून टाकू’, असेही धमकावले आहे. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल तेथे उपस्थित होते. त्यांच्या देखत हा सर्व प्रकार चालू होता आणि त्यांनी याविषयी एक अवाक्षरही काढले नाही. यातून त्यांनाही स्वाती यांना अशी मारहाण होणे अपेक्षित होते कि काय ? असे वाटते.

अरविंद केजरीवाल आणि स्वाती मालीवाल यांच्या राजकीय कारकीर्दीच्या आधीचा विचार केला, तर अरविंद केजरीवाल ज्या बिगर-सरकारी संस्थेत काम करत होते, त्याच संस्थेत स्वाती मालीवाल या काम करत होत्या, म्हणजे दोघे एकमेकांशी पूर्वीपासून परिचित आहेत. ‘आप’ची स्थापना केल्यानंतर स्वाती या त्यामध्येही कार्यरत होत्या. त्यांच्यात अंतर्गत काही वाद आहे, हे सूत्र वगळल्यास जेव्हा त्या केजरीवाल यांच्या घरी पोचल्या, तेव्हा विभव यांनी त्यांना ‘तुझे येथे येण्याचे धाडस कसे झाले ?’, असा प्रश्न विचारला. विभव हेसुद्धा देहलीचे सध्या कारागृहात असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या बिगर सरकारी संस्थेत कार्यरत होते, म्हणजे सर्व जण एकमेकांना ओळखतात. असे असूनही एकमेकांविषयी एवढी शत्रूता कशी निर्माण झाली ?

स्वाती मालीवाल या देहली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असल्यामुळे महिलावर्ग त्यांना झालेल्या या मारहाणीमुळे संतप्त आहे. प्रथमदर्शी माहिती अहवाल सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि आपचे पदाधिकारी यांचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. तसे होणेही आवश्यक आहे.

जी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी असतांना तिच्या परिचित महिलेला मारहाण होत असतांना काही कृती करत नाही, संबंधितावर कारवाई करत नाही, अशा व्यक्तीच्या राज्यात महिलांची सुरक्षा रामभरोसेच असणार, यात शंकाच नाही. त्यामुळेच देहलीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. निर्भया बलात्कार प्रकरण असो, साक्षीची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या असो, या हत्यांनी संपूर्ण देश हादरला होता. कुणीही या मुलींच्या साहाय्यासाठी आले नाही. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. येथे तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महिलेला मारहाण होत आहे, ती वाचवण्यासाठी टाहो फोडत असतांनाही मुख्यमंत्री केजरीवाल थंड डोक्याने त्याकडे कसे काय पहात शांत बसू शकतात ? अशांच्या राज्यात मुली-महिला सुरक्षित नाहीतच ! या पक्षाच्या एक प्रवक्त्या आतिषी काय म्हणतात, तर ‘म्हणे भाजपने ठरवून, नियोजनबद्धरित्या केलेली ही कृती आहे.’ आतिषी स्वत: एक महिला आहेत. असे असूनही एका महिलेला झालेली मारहाण आणि तिचा विनयभंग याविषयी त्यांचे विचार एवढ्या खालच्या थराचे आहेत की, त्याही निषेधाला पात्र आहेत.

‘आप’चे प्रताप !

‘भारतातून भ्रष्टाचार नष्ट करू’, ‘भारत भ्रष्टाचारमुक्त करू’ या मोठ्या उद्देशाने सामान्य नागरिकांचा पक्ष म्हणून ‘आप’ची स्थापना करण्यात आली. प्रारंभी सामान्य नागरिकांमध्ये एवढ्या बलाढ्य राजकीय पक्षांमध्ये सर्वसामान्यांतून वर आलेला पक्ष असल्यामुळे तो जनतेसाठी काही चांगले कार्य करील, भारतियांना भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल, असे आशादायी वातावरण निर्माण झाले होते; मात्र ही शक्यता फोल ठरली. आप पक्ष सतत काही ना काही समस्या, घोटाळ्यांचे आरोप यांमुळे चर्चेत राहिला.

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आम आदमी पक्षाचे नावच मद्य घोटाळ्याशी संबंधित आरोपपत्रात आरोपी म्हणून दाखवले आहे. एखाद्या घोटाळ्याच्या प्रकरणात संपूर्ण पक्षाचेच नाव भ्रष्टाचारी म्हणून आरोपपत्रात नोंद होण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे. मद्य घोटाळ्यात अटक झालेले ‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजय सिंह हेसुद्धा नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. उपमुख्यमंत्री सिसोदीया अद्याप कारागृहात आहेत. यापूर्वीही आपचे आमदार, मंत्री यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. काहींनी पदाचे त्यागपत्रही दिले आहे. गेल्याच मासात आपच्या मंत्रीमंडळातील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार आनंद यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. ‘पक्षाची वाटचाल भ्रष्टाचारविरोधी पक्षापासून ते भ्रष्टाचारग्रस्त पक्ष अशी झाली आहे, पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे मंत्रीपदाचे त्यागपत्र देत आहे’, असे त्यांनी सांगितले आहे. याप्रकारे आपचे मंत्री, पदाधिकारीच ‘आप’ला ‘घरचा अहेर’ देत आहेत. पक्षाची वाटचाल खरोखरीच भ्रष्टाचार करणार्‍या पक्षाकडे झाली आहे. आपचे पदाधिकारी ताहीर हुसेन यांचा देहली दंगलीत मोठा सहभाग असल्याचे उघडकीस आले. ते हिंसा करण्यातच सहभागी होते. ‘देहली जल बोर्ड’ घोटाळ्यामध्ये आपच्या पदाधिकार्‍यांना पैसे मिळाले आहेत’, असे ‘ईडी’ला आढळल्यामुळे त्यांनी पक्षाशी संबंधित १२ ठिकाणांवर धाडी घातल्या. ‘ईडी’चा असाही आरोप आहे की, या घोटाळ्यामध्ये जे पैसे मिळाले, ते आपने निवडणुकीसाठी वापरले आहेत. आप विषयी अशा अनेक गोष्टी उघड होत आहेत. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच घोटाळ्याच्या प्रकरणी कारागृहात जातात, तो पक्ष देहलीसारख्या भारतातील मुख्य शहरावर राज्य करण्याच्या पात्रतेचा आहे का ? ज्या पक्षातील महिलांचा सन्मान केला जात नाही, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, तो पक्ष राज्य करण्यास लायक आहे का ? देहलीतील जनतेने मोठ्या आशेने ‘आप’ला निवडून दिले; मात्र त्यांच्या आशा पार धुळीस मिळाल्याचे त्यांना पहायला मिळाले. तत्त्वे, नीतीमूल्ये यांच्याऐवजी पैशांना अधिक महत्त्व दिले तर काय होते ? प्रामाणिक, राष्ट्रप्रेम नसलेले लोक सत्तेत आल्यावर काय होते ? याचे ‘आप’ पक्ष एक उत्तम उदाहरण आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्यानंतर त्याविषयी पुरावे मागणारे अरविंद केजरीवालच होते. या पक्षाच्या स्थापनेपूर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध अविरत लढा देत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. स्वाती मालीवाल यांच्यावरील आक्रमणामुळे ‘आप’ पक्ष सामान्यांना आपला न वाटता तो तापच वाटत आहे, हेच खरे !

स्वतःच्या निवासस्थानी खासदार महिलेला मारहाण होतांना काही न करणारे मुख्यमंत्री राज्यातील महिलांना कधी सुरक्षा देऊ शकतील का ?