International Monetary Fund : पाकने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर पसरले हात !

६ अब्ज डॉलर्सचे (५० सहस्र कोटी रुपयांचे) मागितले साहाय्य !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनही बिकटच आहे. अशातच त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ६ अब्ज डॉलर्सच्या (५० सहस्र कोटी रुपयांच्या) साहाय्याची विनंती केली आहे. पाकला वित्तीय तुटीने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. या रोख टंचाईचा सामना करण्यासाठीच पाकने नवीन ‘बेलआऊट पॅकेज’साठी नाणेनिधीकडे हात पसरले आहेत. बेलआऊट पॅकेज म्हणजे आर्थिक डबघाईला आलेल्या देशाला अर्थसाहाय्य करण्याची प्रक्रिया.

बेलआऊट पॅकेजवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक गट पाकमध्ये पोचला आहे. जर चर्चा यशस्वी झाली, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेले २४ वे बेलआऊट पॅकेज असेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका ज्युली कोझाक म्हणाल्या की, पाकला गेलेला आमचा गट या आठवड्यात बेलआऊट पॅकेजच्या संदर्भात पाकिस्तानी अधिकार्‍यांशी चर्चा करेल. आमचा गट पुढील १० दिवस पाकिस्तानमध्ये राहू शकतो. याखेरीज वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आगामी अर्थसंकल्पावरही अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्‍या पाकने स्वतःच्या देशातील आतंकवाद नष्ट केला, तरच त्याला अर्थसाहाय्य देण्यात यावे, यासाठी भारताने जागतिक स्तरावर अन्य देशांचा दबावगट बनवला पाहिजे !