प्रश्न : मंत्राचा जप (नामस्मरण) करण्याचे महत्त्व काय आहे ?
श्री (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) : जेव्हा कुणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहतात, तेव्हा तुम्हाला कसे वाटते ? जर कुणी तुम्हाला म्हटले, ‘तुम्ही गाढव आहात’, तर तुम्हाला कसे वाटते ? त्यामुळे काय निर्माण होते ? नकारात्मक तरंग उठतात, तुम्हाला राग येतो. तुमच्या पोटात, डोक्यात काहीतरी होऊ लागते. जर एखादा वाईट शब्द तुमच्यात इतक्या प्रतिक्रिया घडवू शकतो, तर मग एखादा छानसा शब्द, वैश्विक शक्तीने भरलेला एखाद्या जपाचा/मंत्राचा तुमच्या शरिरावर काहीच परिणाम करणार नाही का ?
मंत्राचा/जपाचा तुमच्या शरिरावर काहीच परिणाम होत नाही, हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. परिणाम हा होतोच. मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळत असतात. कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की, तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे का ? व्यक्तीच्या भोवतीचे नकारात्मक तरंग त्यांना नकोसे वाटतात. मंत्र या नकारात्मक तरंगांना अधिक सकारात्मक बनवतात. हाच मंत्र/जप जपण्याचा लाभ आहे. सद्गुण आणि सद्विचार यांच्या आधारे स्वतःचे व्यक्तीमत्त्व प्रकाशमान करण्यासाठी अन् मनातील विकारांचे उच्चाटन करण्यासाठी नामसाधना प्रभावी आहे. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो. अहंकार गळला, म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो.
– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)