संपादकीय : धर्मद्वेषी काँग्रेस आणि हिंदुत्व !

डीडी न्यूज’चे वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव

काँग्रेस हिंदुद्वेषी आहे आणि ‘हिंदुद्वेष करणे’, हा तिचा  जन्मसिद्ध अधिकार आहे. याविषयी कोणत्याही धर्मप्रेमी हिंदूचे दुमत नसावे. आतापर्यंतच्या अनेक दशकांपासून काँग्रेसच्या या रूपाची पावलोपावली प्रचीती आलेली आहे. नुकतेच यासंदर्भातच आणखी एक नवे उदाहरण समोर आले. काँग्रेस सरकारच्या काळात ‘डीडी न्यूज’ या सरकारी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना स्वतःच्या मनगटावर लाल दोरा बांधण्याची अनुमती नव्हती. ‘तुम्ही बांधलेला लाल दोरा पडद्यावर दिसता कामा नये’, अशा शब्दांत ‘दूरदर्शन’चे अधिकारी पत्रकारांना धमकावत. काँग्रेसचे हे वास्तव ‘डीडी न्यूज’चे वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी नुकतेच उघड केले.

हिंदुद्वेषाची साखळी !

काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘हिंदुत्व’ हा शब्द वापरणेच काय, तर हिंदु धर्माचा विचार करणेही अयोग्य मानले जात होते. हिंदु धर्म, संस्कृती यांना दूर ढकलण्याचेच काम काँग्रेसने केले. मंदिरात जाणार्‍यांवर टीका केली जायची; मात्र प्रार्थनास्थळांत जाणार्‍या अन्य धर्मियांवर सवलतींची खैरात होत असे. केवळ दूरदर्शनवरच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना

कुंकू किंवा टिकली लावण्यास, केसांत फुले माळण्यास, हातावर मेंदी काढू देण्यास, तसेच विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावण्यास विरोध करणारी हीच काँग्रेस होती. काही प्रसंगांत तर अशा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरही काढण्यात आले होते. लाल धाग्याला विरोध करणारे काँग्रेसी रमझानच्या काळात मात्र ‘एम्’ असे लिहिलेल्या टोप्या घालतात. त्यांना विरोध करायला हे काँग्रेसी कधी त्यांच्या बिळातून बाहेर येत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. काँग्रेसच्या दृष्टीने ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदुत्वाचा सातत्याने दुःस्वास करणे अन् हिंदु धर्माला नष्ट करू पहाणे होय !’ म्हणूनच अशा हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला सूज्ञ जनतेने सत्तेतून पायउतार केले. काँग्रेसची भीषण राजवट उलथवण्यात हिंदुत्वच एक प्रकारे यशस्वी ठरले. असे जरी असले, तरी काँग्रेसमधील हिंदुद्वेष काही संपलेला नाही. तो आतमध्ये धगधगतच आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत पालट झालेला नाही. आजही अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते.

बाबरीच्या विध्वंसानंतर काँग्रेसने ‘दूरदर्शन’च्या बोधचिन्हाचा भगवा रंग पालटून तो निळ्या रंगाचा केला. आता केंद्रात सत्तेवर असणार्‍या भाजप शासनाने तो पुन्हा पालटून भगवा केला आहे. रंगांना जरी धर्म नसला, तर भगव्याविषयीची हिंदूंची श्रद्धा वेगळीच आहे, हे काँग्रेसही जाणते. भाजपने पुन्हा ‘दूरदर्शन’चे भगवेकरण केल्याने काँग्रेसला पोटशूळ उठला नसेल तरच नवल ! काँग्रेसच्या काळात दूरदर्शनवर हिंदु चिन्हे दाखवण्यात येत नसत. लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही वर्ष २००५ मध्ये दूरदर्शनवर धार्मिक भजन गाण्यापासून रोखण्यात आले होते; कारण त्यात भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाल्याचा उल्लेख होता. प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारणे, श्रीरामाचा अयोध्येत जन्म झाल्याचे नाकारणे, हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालू पहाणे, ‘भगवा आतंकवाद’ असा शब्दप्रयोग रूढ करू पहाणे, जिहाद अन् धर्मांतर यांना प्रोत्साहन देणे, आतंकवाद्यांना बिर्याणी खाऊ घालणे यांसह हिंदुद्वेषाचे अनेक प्रकार काँग्रेसने केले आहेत अन् करतच आहेत. काँग्रेसच्या राज्यात एका हिंदूला पारपत्रासाठी छायाचित्र काढतांना कपाळावरील टिळा पुसण्यास सांगण्यात आल्याचे त्याने सांगितले होते. अशा प्रकारे ही हिंदुद्वेषाची साखळी न संपणारी आहे. हिंदूबहुल भारतात असे प्रकार होणे दुर्दैवी होय !

तत्कालीन काँग्रेसने सनातन धर्म नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या सत्ताकाळात हनुमान चालिसा ऐकणे, हाही गुन्हाच मानला जात असे. दंगली भडकावण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांना निर्दाेष ठरवून त्यांच्यावरील गुन्हे काँग्रेसने मागे घेतले; पण निर्दाेष असणार्‍या रामभक्तांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकले. हा त्यांचा हिंदुद्वेषच होय ! काँग्रेस हिंदूंकडून ओरबाडून घेण्यासाठी किंवा त्यांच्यावर अतिक्रमण करण्यासाठीच बसलेली आहे, हे आजवरच्या अनेक घटनांमधून सिद्ध होते. हिंदूंवर बळजोरी केली की, स्वतःची (अल्पसंख्यांकांची) मतपेटी खूश होते, हे लक्षात घेऊन काँग्रेस पावले उचलते; म्हणूनच तर यंदाच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या घोषणापत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुस्लीम लीगचा जाहीरनामा’ असे संबोधले आहे.

भारतावर ६० वर्षे राज्य करण्यामागे काँग्रेसचा हेतू निव्वळ हिंदुद्वेष करणे आणि देशाला नष्ट करणे, हा होता, हे सर्वश्रुतच होते; पण नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे काँग्रेसचा विनाशकारी पराभव झाला. या पराभवातून आता काँग्रेस काही वर येऊ शकत नाही. काँग्रेसचे पुनरुत्थान होणे कदापि शक्य नाही. त्यामुळेच काँग्रेसला पालटण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आजवर दांभिक धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशातील बहुसंख्य समाजावर त्यांची ओळख पुसण्यासाठी बळजोरी केली, यातून काँग्रेसचा उद्दामपणाच दिसून येतो. स्वतः तुष्टीकरणाचे राजकारण करायचे आणि राजकारणात धर्म आणत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांच्यावर करायचा. दोन्ही बाजूंनी ढोल बडवणार्‍या काँग्रेसचा निषेधच करायला हवा. हिंदुद्वेषाची वाढती शृंखला वेळीच नष्ट करायला हवी.

हिंदुत्वाला पुनर्झळाळी !

आज देशात हिंदुत्वाचे वारे वहात आहेत. देशात परिवर्तन घडत आहे. हिंदू जागृत होत आहेत. हिंदु धर्मावर आलेली काजळी दूर होऊन धर्माला पुनर्वैभव प्राप्त होत आहे. हिंदु मंदिरांचे पुनरुज्जीवन होत आहे. आजचे हिंदुत्व, म्हणजे तळपता सूर्य आहे आणि धर्माचरण करणारे हिंदू, म्हणजे प्रखर सूर्याचे किरण आहेत. ‘हे किरण विश्वाच्या कानाकोपर्‍यात पोचून हिंदुत्व आणि हिंदु धर्म अबाधित ठेवतील’, हे प्रत्येक हिंदूचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असे वचन आहे. हे वचन हिंदू पूर्ण करतील, यात शंका नाही.

सध्याचे हे परिवर्तन पहाता कुणी विरोध केलाच, तर हातावरील लाल दोरा लपवला जाणार नाहीच, उलट कपाळावर लाल टिळा लावून हात आणि कपाळ दोन्हींतून हिंदुत्वाचे दर्शन संपूर्ण जगाला करवून दिले जाईल. हिंदुत्वाचा आवाज कधीच दबला जाणार नाही, उलट आता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल ! आता हिंदुत्वाचा पाया रचला गेलाच आहे. पुढे योग्य काळ येताच हिंदु राष्ट्राचा कळस लवकरच राष्ट्र मंदिरावर बसवलेला दिसेल. कालौघात नष्ट होत जाणार्‍या काँग्रेसला हा कळस पहायला मिळेल का ? हा मात्र प्रश्नच आहे.

रसातळाला जाणार्‍या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !